लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: स्वातंत्र्य दिन हा सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. ठाण्यातील डाॅग्ज वर्ल्ड इंडिया यांच्या वतीने ‘पेट परेड’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या पेट परेड मध्ये २५० पाळीव प्राणी व ४०० प्राणी पालकांचा सहभाग होता. प्रत्येक जण हातात राष्ट्रध्वज घेऊन देशभक्तिपर गाणी, घोषणा देत या परेड मध्ये सहभागी झाले. ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ते खेवरा सर्कल या मार्गावर ही पेट परेड काढण्यात आली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या प्रभातफेऱ्या असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील डाॅग्ज वर्ल्ड इंडिया या संस्थेच्या वतीने पाळीव प्राण्यांकरिता ‘पेट परेडचे’ आयोजन करण्यात आले होते. मागील पाच वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट हे पाळीव प्राणी आणि पालक यांचे सामाजिकीकरण करणे हे आहे.
हेही वाचा… डोंबिवली, कल्याणमध्ये वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी वाहन मालक हैराण
तसेच या परेड मध्ये पोलीस आणि सैन्य दलात सेवा केलेल्या श्वानांचा सत्कार केला जातो. या पाळीव प्राण्यांना त्यांचे पालक विविध प्रकारे सजवून या परेड मध्ये सहभागी झाले होते. या परेड मध्ये श्वान, मांजर, घोडे यांचा समावेश होता. ससा, सरडा(इग्वानु), विविध जातीचे दुर्मिळ श्वान, मांजर, विविध पक्ष्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक प्राण्यांचा या मध्ये सहभाग दिसून आला.
या पेट परेड मध्ये पालकांनी हातात राष्ट्रध्वज घेतला होता. देशभक्तीपर गीत, घोषणा देत नागरिकांना प्राण्यांच्या सोबत हा स्वांतत्र्य दिन साजरा केला. ठाण्यात अनोख्या पद्धतीने हा स्वांतत्र्यदिन साजरा करण्यात आला.