ठाणे, भिवंडी, कल्याण शहरांमधील गुन्हेगारी रोखण्यापाठोपाठ वाहतूक कोंडीतून शहरवासीयांची सुटका करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. ठाणे तसेच आसपासच्या शहरात उड्डाणपूल आणि रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार असल्याने वाहतूक कोंडीची समस्या जटिल होण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये मुंब्रा आणि कल्याण भागांतील तरुण सामील झाल्याची बाब राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासातून पुढे आली आहे. त्यामुळे या दहशतवादी संघटनेत सामील होण्यापासून तरुणांना रोखण्याचेही मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. या पाश्र्वभूमीवर ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांच्याशी केलेली बातचीत..
*वाहतुकीचे नियोजन कसे असावे?
ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतील रेल्वे स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन त्याआधारे शहरातील वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे. पुरेशी वाहनतळ व्यवस्था, गरज असेल तिथे सिग्नल यंत्रणा लावणे आणि गरज नसेल तिथे सिग्नल यंत्रणा काढणे आदी कामे करावी लागणार असून त्यासाठी संबंधित विभागांशी संपर्क साधण्यात येत आहे. उरणच्या जेएनपीटी बंदरातून भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचा आकडा मोठा आहे. त्याचप्रमाणे शहरातील वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही कोंडी सोडवायची असेल तर शहरातील वाहतूक मार्गामध्ये बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहतूक शाखेमार्फत तशा उपाययोजना करण्यात येत आहेत. याशिवाय, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर अधिक भर देण्यात येत आहे.
*वाहतूक नियोजन करताना शास्त्रीय अभ्यास आणि लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे?
शहरांमधील बहुतेक रस्ते अरुंद असल्यामुळे त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव नाही. अशा ठिकाणी एकेरी मार्गाचे प्रयोग राबविणे गरजेचे असून त्यासंबंधीचे नियोजन वाहतूक शाखेमार्फत आखण्यात येत आहे. एकेरी मार्ग किंवा वाहतूक मार्गात बदल करत असताना त्या मार्गाचा शास्त्रीय अभ्यास आणि नागरिकांच्या सूचना विचारात घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी कार्यरत असणारे वाहतूक पोलीस कर्मचारी यांचेही मत जाणून घेतले पाहिजे. या सर्वाची मते एकत्रित करूनच वाहतूक मार्गात बदल केले तर ते कोंडीमुक्त प्रवासासाठी सोयीस्कर ठरतात. यामुळे या सर्वाच्या मतांच्या आधारेच वाहतूक बदलांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच ठाणे आणि कल्याण महापालिकांनी शहरातील बहुतेक रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेतली असून यामुळेही शहरातील कोंडी आणखी कमी होणार आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच आसपासच्या परिसरांत वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून या शहरातील वाहतुकीच्या नियोजनाची जबाबदारी सध्या जेमतेम ४०० पोलीस सांभाळत आहेत, मात्र शहरातील कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याचे लक्षात येत आहे. या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात पाचशे नवीन कर्मचारी नेमण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला असून त्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
*विविध कामांनिमित्ताने अन्य शासकीय विभागांचे समन्वय कशा प्रकारे आहे?
ठाणे, कल्याण तसेच अन्य महापालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग या सर्व कार्यालयांशी विविध कामांनिमित्ताने सातत्याने पोलिसांचा संबंध येतो. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरामध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येत असतात आणि अशा प्रकल्पांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महापालिका निधी देत असतात. या सर्व विभागांसोबत उत्तम समन्वय असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रखडलेले काही प्रस्ताव आता मार्गी लागत आहेत. सी.सी. टीव्ही कॅमेरे, पोलीस ठाण्यांसाठी जागा आणि अन्य प्रस्तावांना या विभागांनी मंजुरी दिली आहे. तसेच ठाणे प्रादेशिक परिवहन विभागासोबतही चांगला समन्वय आहे.
*समाज माध्यमांवरील संदेशांमुळे निर्माण होणारी तेढ रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुरामुळे अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच समाज माध्यमांवरील अफवांच्या संदेशामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते. या पाश्र्वभूमीवर समाज माध्यमांवरील संदेशावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या महिनाभरात या विभागाचे कामकाज पूर्णपणे सुरू होईल. याद्वारे शहरातील विविध घटकांशी संपर्क साधण्यात येणार आहे. तसेच समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर आणि अफवांचे स्पष्टीकरणही दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकुरांमुळे तणाव निर्माण होऊन शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी नव्या विभागामार्फत फेसबुक खात्याद्वारे पोलिसांकडून नागरिकांपर्यंत महत्त्वाचे संदेश पोहोचविण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबतही नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. तसेच एखाद्या विषयावर आलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रियांचीही दखल घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
*आयसिसचा वाढता धोका रोखण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात येत आहेत?
आयसिस या दहशतवादी संघटनेचे भारतामधील तरुणांना संघटनेत सामील करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने विविध जनजागृती कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पथनाटय़ स्पर्धा आयोजित आल्या होत्या. आयुक्तालयातील पाच परिमंडळ स्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली असून त्यासाठी दहशतवादाच्या अनुषंगाने चार विषय देण्यात आले होते. वाढत्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रभावना वाढविणे, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. दहशतवादी कृत्यांकडे तरुणांनी वळू नये म्हणून पथनाटय़ प्रयोगाच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच जनजागृतीकरिता या पथनाटय़ाची चित्रफीत सोशल मीडिया तसेच ठाणे पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात येणार आहेत.
नीलेश पानमंद
ई-मेल – lsthane2016@gmail.com