भारत आणि परदेशामध्ये सुरक्षा व्यवस्थापनाच्या निकषांमध्ये मोठी दरी आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज असताना आजही भारतात पारंपरिक पद्धतीनेच याकडे पाहिले जाते, असे मत सुरक्षा क्षेत्रातील मान्यवर ए. के. सेहगल यांनी व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने औद्योगिक सुरक्षा विषयावरील १७ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने अनेक मान्यवरांनी औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा निकषांचे विश्लेषण केले.
विद्या प्रसारक मंडळाच्या पाणिनी सभागृहात झालेल्या या राष्ट्रीय परिषदेमध्ये औद्योगिक सुरक्षेचा वेध घेण्यात आला. औद्योगिकीकरणाच्या रेटय़ामुळे चांगला रोजगार निर्माण झाला असला तरी त्या क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेसाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. परदेशामध्ये याविषयी व्यापक दृष्टीने अभ्यास झाला असून येणाऱ्या निष्कर्षांची अंमलबजावणीसुद्धा झालेली आहे. भारतात मात्र पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या प्रक्रियाच वापरल्या जात आहेत. त्यामुळे या क्षेत्रात व्यापक अभ्यास करून निकषांमध्ये योग्य सुधारणा करण्याची गरज आहे, असे मत सेहगल यांनी व्यक्त केले. औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात नवोदित विद्यार्थ्यांना मुबलक संधी असली तरी त्याची पुरेशी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा कल कमी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. खासगी कंपन्या, सल्लागार कंपन्या आणि सरकारी क्षेत्रातही या क्षेत्रातील तरुणांना चांगल्या संधी आहेत. त्याचा विचार करून त्या दृष्टीने तयारी करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास प्राचार्य. डी. के. नायक, विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव जे. एन. कयाल उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा