सिझमिक
चॉकलेट्स म्हटलं तर थोरामोठय़ांच्याही तोंडाला पाणी सुटतं. आकर्षक रंगीत वेष्टनात गुंडाळलेली ही चविष्ट गोड वडी प्रत्येकालाच आवडते. वाढदिवशी केकसोबत चॉकलेटची हजेरी अगदी हमखास असते. खरं तर गोड मिठाया किंवा खाद्यपदार्थाबाबत भारतीयांचा हात कुणी धरू शकत नाही. मात्र, चॉकलेट निर्मितीच्या प्रांतात आजही बहुराष्ट्रीय कंपन्यांचा वरचष्मा आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार भारतातील ७० टक्के चॉकलेट्सची निर्मिती परदेशी कंपन्यांकडून होते. आधुनिक काळात भारताने विविध क्षेत्रांत नेत्रदीपक यश मिळविले, मात्र चॉकलेटसारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत मात्र अद्याप ‘मेक इन इंडिया’ची छाप पडू शकलेली नाही. त्यामुळे काही बहुराष्ट्रीय कंपन्यांची चॉकलेट उद्योगात जणू काही मक्तेदारी निर्माण झाली आहे. तरीही गेल्या दहा-पंधरा वर्षांत लघुउद्योग क्षेत्रातील काहींनी मात्र चॉकलेट निर्मिती उद्योगात प्रवेश करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. अंबरनाथमधील नरेश कुकरेजा त्यापैकी एक.
अनेक वर्षे खाद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या नरेश कुकरेजा यांना भारतात उत्तम दर्जाचे चॉकलेट्स बनविले जात नसल्याची खंत होती. कच्च्या मालाचे पुरवठादार म्हणून बरीच वर्षे काम केल्याने त्यांना चॉकलेट निर्मितीविषयी माहिती होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील उत्तम चॉकलेट्सची चवही त्यांना ठाऊक होती. या अनुभवाच्या भांडवलावर अंबरनाथमधील आनंदनगर औद्योगिक वसाहतीत त्यांनी २००७ मध्ये चॉकलेट निर्मिती सुरू केली. त्यांनी त्यांच्या चॉकलेटला नाव दिले- सिझमिक.
कोणतीही नवी वस्तू अथवा उत्पादन बाजारात आणताना त्याची जाहिरात करावी लागते. मात्र तुटपुंज्या भांडवलानिशी व्यवसाय करणाऱ्या लघुउद्योजकांना ते शक्य नसते. नरेश कुकरेजा यांच्याकडेही ते बनवीत असलेल्या चॉकलेटची जाहिरात करण्यासाठी पैसे नव्हते. मात्र उत्तम दर्जा, आकर्षक पॅकेजिंग आणि वाजवी किंमत दिली तर हळूहळू का होईना ग्राहकांना आपले चॉकलेट आवडेल, यावर त्यांचा विश्वास होता. आता नऊ वर्षांनंतर त्यांचा विश्वास खरा ठरला आहे. अंबरनाथमधील छोटय़ाशा कारखान्यात तयार होणाऱ्या सिझमिकच्या चॉकलेटची कीर्ती देशभरातील पाच राज्यांत तसेच अफ्रिका आणि दुबईपर्यंत पोहोचली आहे. अशा प्रकारची वस्तू खपविण्यासाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर नेमले जातात. लोकप्रिय सिनेतारका अथवा खेळाडू प्रसार माध्यमांमधून त्याच्या गुणवत्तेचे गोडवे गात असतात. आधुनिक बाजारव्यवस्थेतील हे विपणन तंत्र परवडणारे नसल्याने नरेश कुकरेजा यांनी पारंपरिक पद्धत वापरली. वितरक तसेच दुकानदारांना त्यांचे चॉकलेट एकदा ठेवून पाहण्याची विनंती केली. ‘आधी आमचे चॉकलेट खा, मग आपण बोलू’ ही त्यांची सवय आहे. चॉकलेटच्या अफलातून चवीने ‘सिझमिक’ने स्वत:चा एक ग्राहकवर्ग तयार केला. राज्यभरातील दुकानदार वितरकांकरवी स्वत:हून ऑर्डर देऊ लागले आहेत.
कोणतीही जाहिरात अथवा उत्पादनाच्या विक्रीसाठी कोणतीही विशेष मोहीम न राबविताही सिझमिकने चॉकलेटच्या भारतीय बाजारपेठेत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नरेश कुकरेजा म्हणतात, ‘चॉकलेट निर्मिती उद्योग सुरू करताना आपण बनवीत असलेली वस्तू ही सर्वोत्तमच असली पाहिजे, याबाबतीत मी ठाम होतो. त्यामुळे चॉकलेट उद्योगात सर्वोत्तम मानली जाणारी पूर्णत: स्वयंचलित यंत्रणा जर्मनीहून मागवली. बाजारात उपलब्ध असणाऱ्या चॉकलेट्समध्ये काय आहे, काय नाही याचा अभ्यास केला. त्यानंतरच निरनिराळ्या स्वादांची चॉकलेट्स बाजारात आणली. चॉकलेट वडीची रचना आणि त्याचे पॅकेजिंग आकर्षक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले. क्रीडाप्रकारात स्पर्धा ही नेहमी समान वयोगटात होत असते. मात्र व्यवसायात तसे नसते. इथे तुमचा स्पर्धक तुमच्यापेक्षा कैकपट अधिक सामथ्र्यवान असू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा