केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत सुरू होता कार्यक्रम
ठाणे – विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचे शनिवारी भिवंडी येथील काल्हेर गावात आयोजन करण्यात आले होते. परंतु कार्यक्रमात मंचा जवळ उभारण्यात आलेल्या बॅनरवर राष्ट्रध्वजाचे उलटे छायाचित्र होते. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये विकसित भारत योजनेच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन
विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचतील, हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजनांची पूर्णता करण्याच्या उद्देशाने देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाद्वारे लाभार्थी सोबत संवाद साधणार होते. ठाणे जिल्ह्यातील काल्हेर ग्रामपंचायत येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळपासूनच या कार्यक्रमाची जय्यत तयारी सरकारी पातळीवर सुरू होती. येथे मोठा मंच उभारण्यात आला होता. तसेच या मंचावर एक स्क्रीन आणि दोन भव्य फलक उभारण्यात आले होते. या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे छायाचित्र होते. परंतु फलकांवर राष्ट्रध्वजाचे उलटे छायाचित्र छापले होते. स्क्रीनवर देखील काही वेळ हेच छायाचित्र होते. जिल्हा परिषद ठाणे, पंचायत समिती भिवंडी आणि काल्हेर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत संकल्प यात्रा असा या फलकांवर उल्लेख होता. या कार्यक्रमात केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. असे असतानाही उशिरापर्यत ही चूक सुधारण्यात आली नव्हती.