कल्याण: परदेशात विविध देशांमध्ये नोकरी, निवृत्तीनंतर आपल्या मुलांकडे परदेशात राहत असलेल्या काही कुटुंबीयांची भारतामधील आपल्या निवास स्थान असलेल्या भागात मतदार यादीत नावे आहेत. अशा परदेशस्थांनी भारतातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा निवडणूक अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. अशा प्रकारची कोणतीही सुविधा परदेशातील भारतीय नागरिकांसाठी नसल्याचे निवडणूक विभागाकडून परदेशी भारतीय नागरिकांना कळविण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या विविध भागातील तरूण नोकरीनिमित्त परदेशात गेले आहेत. काही कुटुंबीय आपल्या मुलाच्या सोबत किंवा काही व्यवसाय, उद्योगानिमित्त विदेशात राहत आहेत. यामधील बहुतांशी मंडळींची नावे भारतामधील मतदार यादीत आहेत. भारतात सध्या लोकसभेच्या निवडणुकांचा महौल आहे. परदेशस्थ नागरिक, भारतीय नागरिकांचे भारतामधील निवडणुकांकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : कल्याण: गर्दीच्या वेळेत लोकल प्रवाशांना गर्दुल्ले, मद्यपी आणि गजरे विक्रेत्यांचा उपद्रव

परदेशात राहत असलेले पण भारतात आपल्या गाव, शहरात राहत असलेल्या मतदार यादीत नाव असल्याने अनेक परदेशी भारतीय नागरिकांनी भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची इच्छा तेथून संपर्क करून निवडणूक अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून माहिती घेऊन परदेशात राहत असलेल्या कोणाही भारतीय नागरिकाला टपाल किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध नसल्याचे कळविण्यात आले आहे.

काही भारतीय विदेशात गेल्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे त्यांची कोंडी झाली. अगोदर हे माहित असते तर विदेशात आलो नसतो, असे परदेशस्थ भारतीय सांगतात. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि त्या देशाचे आपण नागरिक आहोत, या अभिमानाने परदेशात राहत असलेल्या काही भारतीयांना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची खूप इच्छा आहे. त्यांनी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू करून लोकसभेसाठी मतदान करता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे. अमेरिका, युरोप, अरब देशातील काही भारतीय नागरिकांनी काही राजकीय पक्षांशी संपर्क करून आम्हाला मतदानासाठी भारतात येण्यासाठी काही साहाय्य होऊ शकेल का, अशी विचारणा केली असल्याचे समजते.

हेही वाचा : ठाणे: लष्कराच्या वाहनाच्या धडकेमुळे सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

आता २० मे रोजीच्या मतदानासाठी भारतात यायचे असेल तर विमानाचे परदेशातून तात्काळ तिकीट काढावे लागेल. यासाठीचा तिकीट खर्च खूप मोठा आहे. हा खर्च निवडणूक काळात करण्यात येत असल्याने राजकीय पक्षांना त्याचा हिशेब निवडणूक आयोगाला द्यावा लागेल. चौकशीचे झंझट मागे नको म्हणून विदेश मतदारांना एक गठ्ठा भारतात मतदानाच्या दिवशी आणण्याचा काही उमेदवार, राजकीय पक्षांचा मनसुबा होता. या विचाराकडे त्यांनी पाठ फिरवली आहे.

भारतात मतदार यादीत नाव असलेल्या परदेशातील भारतीय नागरिकांसाठी टपाली किंंवा अन्य साधनाने मतदान करण्याची व्यवस्था येत्या काळात भारतीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परदेशी भारतीय नागरिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : सिग्नल यंत्रणेत बिघाड; साडेचार तास रेल्वेसेवा ठप्प; आसनगाव-आटगाव स्थानकादरम्यानची घटना

भारतामधील एक मतदार म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची आपली खूप इच्छा आहे. परदेशात आल्यानंतर निवडणुका जाहीर झाल्या, त्यामुळे काही करू शकत नाही. आताच्या तंत्रज्ञान युगात परदेशस्थ भारतीयांना विदेशात राहून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

नितीन वैद्य (निवृत्त एलआयसी अधिकारी, रा. आस्ट्रेलिया, सिडनी) (मूळ निवास, ठाणे, महाराष्ट्र)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indians living in foreign cant vote for lok sabha election 2024 due no voting facility css