लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: शिवसेनेचे ( शिंदे गट) दिवा येथील उपशहर प्रमुख अॅड. आदेश भगत यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे भाजपचे दिवा शहराध्यक्ष रोहीदास मुंडे यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची (एन.सी.) नोंद करण्यात आली आहे. आदेश भगत हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. दरम्यान, अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंडे यांनी शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवक दिव्यातील समस्यांना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. या प्रकारामुळे दिव्यात शिंदे गट आणि भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये विस्तवही जात नसल्याचे स्पष्ट होत आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपने दिवा येथे रुग्णालय उभारणीसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात भाजपचे दिवा शहराध्यक्ष रोहीदास मुंडे यांनी शिंदे गटाचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यावर थेट आरोप केले होते. त्यामुळे सध्या दिव्यात शिंदे गट विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण झालेला आहे. समाजमाध्यमांवरही त्याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, दिवा येथील शिंदे गटाचे उपशहरप्रमुख ॲड. आदेश भगत यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात रोहीदास मुंडे यांच्याविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीत मुंडे यांनी त्यांची नाहक बदनामी केल्याचे म्हटले आहे. या तक्रारीनुसार मुंडे यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा- येऊरचे प्रवेशद्वार आता सायंकाळी ७ वाजताच बंद, रात्रीच्या पार्ट्यांना चाप बसण्याची शक्यता
दरम्यान, दिव्यातील समस्यांना शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक जबाबदार असल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा भाजप दिव्यातील जनतेसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचेही मुंडे म्हणाले. त्यामुळे दिव्यात शिंदे गट आणि भाजपमधील संघर्ष आता वाढत असल्याचे चित्र आहे.