ठाणे : वागळे इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा नेण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यानंतर आता ठाणे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. महापालिकेच्या नियोजनाविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असतानाच, या हस्तांतरण केंद्राविषयी उद्योजकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कचरा हस्तांतरणाच्या नावाखाली या ठिकाणी कचरा भूमी झाल्याचा आरोप उद्योजक करत आहेत. या केंद्रामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत प्रदूषणाचा त्रास येथील कामगारांना सहन करावा लागत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय किंवा बाहेरील राज्यातील ग्राहकाला कंपनीत बोलावताना अनेकदा विचार करावा लागत आहे. येथील केंद्रावर अनेकदा आगी देखील लागल्या आहेत. त्यामुळे या केंद्रालगत असलेल्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची नामुश्की उद्योजकांवर येत आहे.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. याठिकाणी ठाणे शहरातील विविध भागात संकलित होणारा कचरा आणला जातो. त्यानंतर त्याचे वर्गीकरण या केंद्रावर केले जाते. वर्गीकरण झाल्यानंतर तो कचरा डायघर येथे नेला जातो. या कचरा केंद्रावर डोंगराच्या आकारा इतके कचऱ्याचे ढील लागत होते. गेल्या अनेक दिवसांपासून येथील रहिवासी हे कचरा हस्तांतरण केंद्र हटविण्याची मागणी महापालिकेकडे करत होते. परंतु महापालिकेकडून ठोस उपायजोना केली जात नव्हती. काही दिवसांपूर्वीच या कचरा केंद्राला भीषण आग लागली. त्यानंतर कचऱ्यावरून वाद पेटला. शिंदे गटाने या ठिकाणी कचरा गाड्या आल्यास गाड्या फोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील कचरा भिवंडी येथील आतकोली भागातील कचराभूमीवर नेण्यास सुरूवात केली. मात्र, ठाणे ते आतकोली अंतर ३७ किलोमीटर इतके असल्यामुळे शहरातील घंटागाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. ठाण्यातील गृहसंकुलांबाहेर, रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग जमा झालेले दिसत आहेत.

या कचरा हस्तांतरण केंद्राविरोधात उद्योजकांनीही आवाज उठविला आहे. यापूर्वी ठाणे स्माॅल स्केल इंड्स्ट्रीज असोसिएशन (टिसा) या संघटनेने ठाणे महापालिका, जिल्हा उद्योग मित्र विभागाला पत्र व्यवहार केले होते. या कचरा हस्तांतरण केंद्राचे आता कचराभूमीत रुपांतर होत असल्याचे टिसा संघटनेचे म्हणणे आहे. या कचरा हस्तांतरण केंद्राच्या परिसरात अनेक लघु उद्योग, आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यांना हस्तांतरण केंद्राचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यामध्ये आगीच्या घटना येथे वारंवार घडतात. त्यामुळे धूराचे लोट निर्माण होऊन परिसरात प्रदूषण निर्माण होते. स्थानिक रहिवाशांसोबतच, येथे कामानिमित्ताने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. यासाठी कंपनी मालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना लवकर सुट्टी द्यावी लागते. त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे कंपनीच्या कामकाजावर होतो. कचरा हस्तांतरण केंद्रामुळे येथील वृक्ष देखील सुकल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. तसेच कचरा गाड्यांची येथे वाहतुक सुरू झाल्यास वाहतुक कोंडीची समस्या देखील भेडसावत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

कचरा हस्तांतरण केंद्राजवळ माझी कंपनी आहे. सुमारे ३०० कामगार काम करतात. काही दिवसांपूर्वीच आगीमुळे धूर निर्माण झाला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना लवकर सुट्टी द्यावी लागली. याचा अप्रत्यक्षपणे कामकाजावर परिणाम होतो. येथील वृक्ष देखील सुकल्याचे एका उद्योजकाने सांगितले.

कचरा हस्तांतरण केंद्राची आता कचराभूमी झाल्याची परिस्थिती आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधी, प्रदूषण निर्माण होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेकदा कचऱ्याच्या डम्परमुळे वाहतुक कोंडी होत असते. – भावेश मारू, मानद महासचिव, टिसा.

Story img Loader