औद्योगिक विकास असलेल्या आणि उद्योगाच्या आजूबाजूला लोकवस्ती वाढून शहरे विकसित होतात. असे असले तरी उल्हासनगर याला अपवाद आहे. कारण आधी इथे लोकवस्ती वसवण्यात आली आणि त्या लोकांनी उपजीविकेसाठी उद्योग सुरू केले. या उद्योगांची इतकी भरभराट झाली की राज्यातील अनेक व्यापारी खरेदीसाठी उल्हासनगर गाठू लागले. येथील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने या भागात औद्योगिक विकास महामंडळाची सुरुवात केली. एकेकाळी परदेशी मालाची नक्कल करण्यासाठी ओळखला जाणाऱ्या या शहरामध्ये सध्या गुणवत्तापूर्ण वस्तूंसाठीची ओळख राज्यात होऊ लागली आहे. येथील संधी, मराठी समाजाने नकारात्मक गोष्टी पुसून टाकण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे यापूर्वीपासूनची औद्योगिक वसाहत सरकारी आणि महापालिकेच्या औद्योगिक विकासाला पुरक धोरणामुळे हा विकास वाढण्यास मदत होऊ लागली आहे.
उल्हासनगर शहर हे रेशीम, तयार कपडे, फर्निचर, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रोनिक उपकरणांचे उत्पादन केंद्र आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने शहरातील औद्योगिक विकास केला जात असला तरी शहरामध्ये अनेक लघू उद्योगांनी राज्य आणि परराज्यातही ओळख निर्माण केली आहे. या उद्योगांची नोंद होण्याबरोबरच त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळावे या उद्देशाने महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये व्यावसायिक परवाने धोरणाची निर्मिती केली असून त्यातून घरोघरी चालणाऱ्या लघु उद्योगांची नोंद करण्याबरोबरच तेथील उत्पादनांला योग्य परवाने देण्याची सुलभ व्यवस्था केली आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पादनात वाढीबरोबरच शहरातील उत्पादित आणि साठवणूक केल्या जाणाऱ्या उत्पादित वस्तूंची नोंदसुद्धा होऊ शकणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी शुल्काचीसुद्धा ठरवण्यात आले आहे.
उल्हासनगर सिंधी असोसिएशन (यूएसए)
सिंधीबहुल असलेल्या या नगराला सिंधी बांधव सिंधूनगरी असा उल्लेख करत असून या समाजाने सामाजिक, व्यावसायिक, अर्थिक, शैक्षणिक सहकार्यासाठी उल्हासनगर सिंधी असोसिएशनची स्थापना केली आहे. या माध्यमातून व्यावसायिक सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. उद्योगामध्ये दर्जेदार वस्तू देण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली असून महापालिका आणि राज्य शासनाकडून उद्योगांना प्रोत्साहन मिळवण्यासाठी एक दबावगट म्हणूनसुद्धा याचा उपयोग होत असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. नवे उद्योग येण्यासाठी संस्था प्रयत्नशील असून फर्निचर, इलेक्ट्रोनिक्स, आटोमोबाइल, फोटोग्राफी, घरगुती उपयोगांची वस्तू यांची ब्रॅण्डेड दुकाने मोठय़ा संख्येने या भागात येत असल्याने त्यांचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न व्यापाऱ्यांकडून केले जात आहेत.
महिलांसाठी उद्योग भवन..
उल्हासनगरचा औद्योगिक विकासामधील महिलांचा सहभाग वाढावा या उद्देशाने महिलांसाठी उद्योग भवन उभारण्याची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शहरातील गरीब आणि गरजू महिलांना स्वावलंबी करण्यासाठी तसेच गृहउपयोगी वस्तू बनवणे आणि त्याची विक्री करण्यासाठी या भवनाचा उपयोग केला जाऊ शकणार आहे. स्थायी समिती सभापती राजश्री चौधरी यांनी अर्थसंकल्प मांडताना महिलांसाठी उद्योग भवनाची घोषणा केली आहे.