भौगोलिक कार्यकक्षेच्या तुलनेत अपुरा कर्मचारीवर्ग असल्याची कबुली

कंपन्या उत्पादन प्रक्रिया करताना कंपनी अंतर्गत सुरक्षेचे नियम पाळतात का,  कामगारांची सुरक्षितता विचारात घेऊन त्यांना पुरेशी साधने पुरवली जातात का, कौशल्य नसलेला कामगार कंपनीत महत्त्वाच्या ठिकाणी कार्यरत आहे का, अशा प्रकारे कंपनीच्या अंतर्गत सुरक्षेची योग्य काळजी घेतली जाते की नाही याविषयी कंपन्यांचे दर वर्षी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे लेखापरीक्षण करण्यात येते. मात्र, औद्योगिक सुरक्षा विभागाची भौगोलिक कार्यकक्षा मोठी असल्याने तसेच पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्याने या भागातील औद्योगिक लेखापरीक्षण नियमित केले जात नाही, अशी धक्कादायक कबुली औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागानेच माहिती अधिकाराच्या माध्यमातून दिली आहे.

कल्याणमधील बैल बाजारातील गांधी संकुलात औद्योगिक सुरक्षा विभागाचे कार्यालय आहे. कल्याण औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अंतर्गत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कोन, सरावली, भिवंडी, मुरबाड, शहापूर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा हे औद्योगिक विभाग आहेत. या विभागाच्या अंतर्गत सुमारे एक हजार ते बाराशे लहानमोठे कारखाने आहेत. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कल्याण कार्यालयात फक्त तेरा कर्मचारी कार्यरत आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सहसंचालक हा कार्यालय प्रमुख असतो. कारखान्यांच्या निरीक्षणाकरिता चार उपसंचालक व तीन साहाय्यक संचालक हे अधिकारी कार्यरत असतात. कार्यालयीन कामाकरिता पाच लिपिक संवर्गातील कर्मचारी असतात. कल्याणमधील औद्योगिक सुरक्षा कार्यालयातील सहसंचालक व दोन साहाय्यक संचालक ही पदे रिक्त आहेत. ज्या कार्यालय प्रमुखाने कंपन्यांचे सुरक्षा परीक्षण करायचे त्याचेच पद रिक्त असल्याने दुय्यम दर्जाचे अधिकारी कंपन्यांच्या दारात आपले दुकान मांडतात अशा उद्योजकांच्या तक्रारी आहेत.

जानेवारी २०११ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत कंपनी सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या १०७ कंपन्यांना विभागाने नोटिसा पाठविल्या होत्या. यामधील ७ कंपन्या डोंबिवली विभागातील असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या कालावधीत एकाही कंपनीला बंदची नोटीस पाठविण्यात आली नव्हती, असे उत्तर उपसंचालक भू. र. हिरेकर यांनी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांना माहिती अधिकारात दिले आहे. ज्या कंपन्या औद्योगिक सुरक्षेचे नियम पाळत नाहीत तसेच नोटिशींना समाधानकारक खुलासा करत नाही अशा व्यवस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात येते. खासगी जमिनीवरील कारखान्यांना कारखाने अधिनियम लागू होतात. मात्र, भंगार दुकाने, गोदामे यांना कारखाने अधिनियम लागू होत नसल्याने भिवंडी परिसरातील भंगारे, गोदामे यांच्यावर कारवाई करता येत नसल्याचे उत्तर अधिकाऱ्याने दिले आहे.

दलालांचा राबता

औद्योगिक सुरक्षा विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील कंपन्यांचे दर सहा महिन्यांनी सुरक्षा लेखा परीक्षण केले पाहिजे. पण या विभागात अपुरा कर्मचारीवर्ग असल्याने हा विभाग कंपन्यांच्या सुरक्षा परीक्षणाकडे दुर्लक्ष करतो. फक्त सुरक्षा परीक्षणाच्या नावाखाली या विभागातील अधिकाऱ्यांचे दलाल औद्योगिक क्षेत्रात घिरटय़ा घालत असतात. औद्योगिक सुरक्षा विभागाचा अधिकारी कंपनीत येण्याची शक्यता नसल्याने काही कंपनीचालक नियमबाह्य़ कामे कंपनी आवारात हाती घेतात. कामगारांची सुरक्षा यामध्ये पाळली जात नाही. नियमबाह्य़ कच्च्या मालाचा साठा आवारात केला जातो. याची कुणकुण औद्योगिक विभागाला लागली की तेवढय़ापुरती कारवाई केली जाते.

  • जानेवारी २०११ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत एकूण १३ कामगार विविध कंपन्यांमधील दुर्घटनांमध्ये मरण पावले आहेत.
  • या कालावधीत झालेल्या दुर्घटनांमध्ये १६ कामगार जखमी झाले आहेत.

कंपनीतील दुर्घटनांची कारणे

इलेक्ट्रो स्टॅस्टिक चार्जमुळे आग, एजरला थर्मिक ऑइलचा पुरवठा करणारी वाहिनी फुटली व उष्ण थर्मिक तेलाची गळती होऊन आग लागली, इथेनॉल रिअ‍ॅक्टरमध्ये घेऊन थॅलिक अनहायड्रायडाईट ओतताना रिअ‍ॅक्टरमध्ये आग, वीज शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. स्किमर मशीनजवळ आग, ब्रोमीनचा स्फोट.

Story img Loader