डोंबिवली : डोंबिवली जवळील २७ गावांना येत्या सात दिवसात मुबलक पाणी पुरवठा झाला पाहिजे. असे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी एका बैठकीत दिले होते. त्याला ४८ तास उलटून जात नाहीत तोच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी मध्यरात्री साडे बारा वाजताच्या दरम्यान २७ गावांमधील पाणी चोरी केंद्रांवर छापे मारुन एक बेकायदा मिनरल वाॅटर कंपनी आणि टँकर माफियांचे पाणी चोरीची केंद्रे बंद केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील दोन वर्षापासून २७ गावांचा पाणी पुरवठा झपाट्याने कमी झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यातही रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. या पाणी टंचाईचा गैरफायदा घेत या भागात टँकर लाॅबी सक्रिय झाली आहे. कल्याण डोंबिवली पालिका, एमआयडीसीची कोणतीही पाणी पुरवठयाची परवानगी न घेता हे टँकर मालक पालिका, एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिन्या फोडून त्या वाहिन्यांमधून चोरुन पाणी ५० ते ६० पिंपांमध्ये भरुन ठेवतात. काही ठिकाणी जलवाहिनी लगतच्या विहिरीमध्ये पाणी पाईपव्दारे काढून घेतले जाते. या विहिरी भरल्या ते पाणी टँकरव्दारे उचलून पाणी टंचाई असलेल्या भागात दोन हजारापासून ते तीन हजार रुपयांपर्यंत टँकर दराने विकले जाते. सोसायटी, गाव परिसराची पाण्याची गरज भागविण्यासाठी रहिवासी परिसरातून पैसे जमा करुन, सोसायटी चालक सोसायटी निधीतून पैसे देऊन टँकरचे पाणी विकत घेतात.

हेही वाचा… डोंबिवली जवळील २७ गावांमधील टँकर लाॅबीचे वर्चस्व मोडून काढा, टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा उद्योग मंत्र्यांचा इशारा

काही टँकर चालक सोसायटीला, चाळीला पाणी विकत देताना पावती ४५० रुपयांची फाडतात आणि प्रत्यक्षात रहिवाशांकडून दोन ते तीन हजार रुपये वसूल करतात, असे रहिवाशांनी सांगितले. २७ गावांमधून बारवी धरणाकडून आलेल्या जलवाहिन्या गेल्या आहेत. या जलवाहिन्या समाजकंटकांकडून जागोजागी फोडून तेथे वाहन धुण्याची कार्यशाळा, पाणी चोरीची केंद्रे तयार केली आहेत, असे स्थानिक ग्रामस्थ सांगतात. या पाणी चोरीमुळे २७ गाव परिसराला मुबलक प्रमाणात होणारा पाणी पुरवठा टँकर माफियांकडून परस्पर पळविला जातो. अनेक वर्ष हा प्रकार कल्याण शिळफाटा रस्त्यालगत, काटई-बदलापूर रस्त्यावर सुरू आहे. या गंभीर विषयाकडे एमआयडीसी, पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने २७ गावांमधील पाणी संकट गंभीर झाले आहे.

हेही वाचा… कल्याणच्या नववर्ष स्वागत यात्रेत ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’

मिनरल वाॅटर कंपनी

चोरीच्या पाण्यावर या भागात बाटलीव्दारे स्वच्छ पाणी विकणाऱ्या काही कंपन्या स्थापन झाल्या आहेत. या कंपन्यां कल्याण डोंबिवली पालिका, एमआयडीसी किंवा महसूल विभागाकडे नोंदणीकृत नाहीत. दोन महिन्यापूर्वी शीळ रस्त्यावरील एका बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपनीवर महावितरणच्या ठाणे विभागातील अधिकाऱ्यांनी छापा मारुन वीज चोरी पकडली होती. ते प्रकरण नंतर बाहेर आलेच नाही, अशी माहिती या भागातील रहिवाशांनी दिली. त्यामुळे पालिका, एमआयडीसीचा अधिकारी वर्गही पाणी चोरीला तितकाच जबाबदार आहे, असे रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा… ठाणे: मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरणारे नामचीन गुंड पोलिसांना दिसत नाहीत का?

उद्योग मंत्र्यांचा छापा

२७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आणि पाणी चोरी होत असल्याची माहिती उद्योगमंत्री सामंत यांना मिळाली होती. माहितीची गुप्त माहितगारातर्फे खात्री केल्यानंतर मंत्री सामंत यांनी सोमवारी मध्यरात्री साडे बारा वाजता २७ गावांमधील टँकर मालकांची पाणी चोरीची चार केंद्रे, एक बेकायदा मिनरल वाॅटरचा कारखाना याठिकाणी छापे मारले. त्यावेळी पालिका, एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरुन टँकर चालक चोरुन पाणी काढत असल्याचे सामंत यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ टँकर चालकांचे टँकर जप्त आणि बंदिस्त बाटलीबंद पाणी विकणारी कंपनी सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, प्रांत अभिजीत भांडे पाटील यांना दिले.

हेही वाचा… Maharashtra News Live: “एकदा राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना हे न्यायालय परत बोलवू शकत नाही”, हरीश साळवेंचा SC मध्ये युक्तिवाद!

ठाकुर्ली बालाजी आंगण परिसरातील विहिरीतून, पिंपळेश्वर हाॅटेल समोरील जलवाहिनीवरुन काही टँकर चालक पाणी चोरी करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. एमआयडीसीत जुन्या अग्निशमन केंद्राच्या ठिकाणावरुन दिवसभर टँकरच्या माध्यमातून पाणी उपसा सुरू असतो, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. जागोजागी पाणी उचलण्याची टँकर मालकांना पालिका, एमआयडीसीने मुभा दिल्याने त्याचा गैरफायदा टँकर मालक घेत आहेत.

“२७ गावांमधील नागरिकांना पाणीटंचाईमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी यापुढे पाणी चोरांवर वर्षभर नियमित कारवाई केली जाईल.” – उदय सामंत, उद्योगमंत्री.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industry minister made a raid on tanker lobby in dombivli area at midnight asj