डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील डोंबिवली जवळील निळजे गावाजवळील लोढा हेवन या गृहसंकुल परिसरातील भुयारी गटात एक चार ते पाच महिन्यांचे मृत अर्भक मानपाडा पोलिसांना आढळले. पोलिसांनी हे मृत अर्भक भुयारी गटारात फेकून देणाऱ्या अज्ञात इसमा विरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
निळजे येथील एका गृहसंकुलात राहत असलेल्या एका सेवानिवृत्त व्यक्तिने मानपाडा पोलिसांना माहिती दिली की निळजे येथील लोढा हेवन परिसरातील भुयारी गटारात एक अर्भक फेकून देण्यात आले आहे. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस पथक घटनास्थळी आले.
पोलीस निरीक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड, साहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना चंद्रेश मेमोरिअल शाळे समोर, निळजे लोढा हेवन येथील सुंकलाजवळ भुयारी गटारात चार ते पाच महिन्यांचे अर्भक अज्ञातांनी फेकून दिल्याचे आढळले. हे अर्भक मृत होते. ते स्त्री की पुरूष जाती आहे हे पोलीस तपासात निष्पन्न झाले नाही. भुयारी गटारातून अर्भक बाहेर काढण्यात आले.
कायदेशीर पालकत्व लपविण्याच्या उद्देशाने अज्ञाताने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांनी अज्ञाता विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. लोढा हेवन परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून हे कृत्य कोणी केले याचा तपास सुरू केला आहे.