सुरक्षा भिंतीला भगदाड पाडून प्रवेश करणाऱ्यास अटक
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या आवारात बेकायदा शिरकाव करणाऱ्या तरुणाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक केली. अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षा भिंतीला भगदाड पाडून या तरुणाने घुसखोरी केली. प्रकल्पाच्या आवारात रात्रीच्या वेळी फिरत असताना त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले.
अतिसंवेदनशील असलेल्या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीला भगदाड पाडून प्रकल्पाच्या निषेध क्षेत्रात राजेंद्र गवारी हा तरुण चोरीच्या उद्देशाने प्रवेश करत होता. जुने पोफरण गावातील मंदिराजवळ भगदाड पाडून कोणी तरी अणुऊर्जा प्रकल्पात शिरकाव करत असल्याची कुणकुण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना लागली. त्यानुसार सुरक्षा जवानांनी पाळत ठेवून त्याला ताब्यात घेतले. अणुऊर्जा प्रकल्प परिसरात सुरक्षेसाठी दोन उंच भिंती असून दोन्ही भिंतींच्या मध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांना फिरण्यासाठी रस्ता बनवण्यात आला आहे. प्रकल्पाची सुरक्षाव्यवस्था पाहणारे केंद्र औद्योगिक सुरक्षा विभागाचे जवान या भागाची पाहणी दररोजच करत असतात. मात्र तरीही मोठय़ा हुशारीने दगडी भिंतीला भगदाड पाडून प्रवेश केल्याचा प्रकार समोर आल्याने प्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मोहनलाल मेघवाल यांच्या फिर्यादीनुसार तारापूर पोलीस स्थानकात अणुऊर्जा प्रकल्पाच्या आवारात अनधिकृत प्रवेश करून तरुण फिरत असल्याने शासकीय गुपिते अधिनियम १९२३ कलम ३ पोटकलम (१), (क)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजेंद्र गवारीला पालघर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
केंद्र औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षा विभागाने आरोपीला आमच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानुसार पालघर न्यायालयाने आरोपीला मंगळवारी जामीन मंजूर केला.
– अरुण भिसे, पोलीस उपनिरीक्षक, तारापूर