पिचकारी १० ते २०, तर रंग ५० रुपयांनी महाग
धुळवड खेळण्यासाठी यंदा सारेच सज्ज झाले असले, तरी यंदाच्या धुळवडीला महागाईचा रंग आहे. बाजारपेठेतील पिचकाऱ्या १० ते २० रुपयांनी महागल्या असून रंगही ५० रुपयांनी महाग झाले आहेत. यंदा बाजारपेठा विविध आकाराच्या पिचकाऱ्यांनी आणि धुळवड साहित्यांनी सजल्या आहेत. छोटा भीम, पाण्याची टाकी आदी पिचकाऱ्या यंदा धुळवडीचे आकर्षण आहे.
धुलिवंदनाला अवघे पाच दिवस उरले असून आठ दिवसापूर्वीच वसईतील सर्वच व्यापारी, दुकानदारांनी पिचकाऱ्या, विविध प्रकारचे रंग विक्रीसाठी दुकानांत ठेवले आहेत. सध्या बाजारात लहान-मोठय़ा पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. छोटय़ा पिचकाऱ्यांपासून दोन लिटर रंग भरण्या इतपत पिचकाऱ्यांचा यात समावेश आहे. मोबाइल, बाहुल्या, बंदुकी, प्राणी, पक्षी आदी आकाराच्या पिचकाऱ्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठय़ा पिचकाऱ्यांच्या किमतीमध्ये १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी २० रुपयांत मिळणारी पिचकारी ३० ते ३५ रुपयांमध्ये मिळत आहे. लहान मुलांमध्ये आकर्षण असलेली छोटा भीम, डोरेमोन, शिनचेन, अर्जुन आदी कार्टून्सच्या पिचकाऱ्या थेट २५० ते ३०० रुपयांमध्ये विकल्या जात आहेत. रंगाच्या किमतीदेखील वाढल्या आहेत. मागील वर्षी १०० रुपये किलोने विकले जाणारे रंग या वर्षी १५० रुपये किलोने विकले जात असल्याचे रंग विक्रेत्याने सांगितले.
आठ-दहा टक्क्यांचा नफा
रंग व पिचकाऱ्यांचा व्यवसाय आठ ते दहा दिवसांचा असतो. यामुळे मागणी व पसंतीनुसार पिचकाऱ्यांचे नमुने व्यापाऱ्यांनी विक्रीस आणले आहेत. सण संपताच शिल्लक साहित्य तसेच जपून ठेवावे लागते. या काळात आठ ते दहा टक्क्यांचा नफा या व्यवसायात मिळतो. पिचकाऱ्यांबरोबरच विविध प्रकारचे रंगही बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये खडी, पावडर, सिल्व्हर कलर, कॅप्सूल कलर यांचा समावेश आहे. वसईमध्ये झेंडा बाजार, आनंदनगर मार्केट, विरार बोळिंज नाका, नायगाव येथील बाजारात साहित्याचे स्टॉल सजले आहेत.