निखिल अहिरे
ठाणे : ठाण्यातील बहुतांश खानावळधारक तसेच पोळी-भाजी केंद्र चालकांनी शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या थाळीच्या दरात ५ ते १० रुपयांनी वाढ केली आहे. मागील वर्षभरात थाळीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.
मागील वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने ठाण्यातील बहुतांश खानावळ, पोळी भाजी केंद्र धारकांनी शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाच्या थाळीमागे १० ते १५ रुपयांनी वाढ केली होती. मागील काही महिन्यांत दोन्ही सिलिंडरच्या दरात सुमारे ९० ते १५० रुपयांनी वाढ झाली होती. जेवणाची किंमत वाढविल्यास ग्राहक तुटण्याच्या भीतीने खानावळ आणि पोळी भाजी केंद्र चालकांनी थाळीच्या दरात वाढ केली नव्हती. मात्र मागच्या सहा महिन्यांच्या कालावधीत घरगुती उपयोगात येणाऱ्या १४ किलो वजनी गॅस सिलिंडरच्या दरात ७० ते ८० रुपयांनी आणि व्यवसायिक वापरात येणाऱ्या १९ किलो गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच वाहतूक खर्च वाढल्याने भाज्यांच्या दरातही चांगलीच वाढ झाली आहे. यामुळे खानावळ आणि पोळीभाजी केंद्र चालकांचे खर्चाचे दैनंदिन गणित बिघडले आहे. यामुळे या महागाईत तग धरून ठेवण्यासाठी तसेच खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी शाकाहारी आणि मांसाहारी जेवण्याच्या थाळी बरोबरच, चपात्या आणि भाजीच्या किमतींमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. आधीच इंधन दरवाढीने हैराण झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आत घरघुती पद्धतीचे जेवण हवे असल्यास अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.
व्यावसायिकांची कोंडी
ठाण्यासह इतर शहरांमध्ये अनेक महिलांकडून पोळी – भाजी केंद्र चालविण्यात येतात. सध्या दरवाढ केली तर आमच्याकडील ग्राहक दुसरा पर्याय शोधेल. केवळ ६० ते ७० रुपयांमध्ये वरण, भात, दोन भाज्या, तीन चपात्या आणि एक गोड पदार्थ कसा द्यावा. असा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. आठवडय़ाला एक १९ किलो वजनी सिलिंडर लागते. त्यात जेवणाच्या इतर जिन्नसही महाग झाले आहेत. अशा वाढत्या महागाईत केंद्र चालविणे अवघड होत असल्याचे ठाण्यातील अन्नपूर्णा पोळीभाजी केंद्र चालविणाऱ्या वंदना भोसले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
व्यावसायिक सिलिंडर दर (१९ किलो)
सप्टेंबर २०२१ – १ हजार ६५० रुपये
एप्रिल २०२२ – २ हजार २०० रुपये
१ एप्रिलपासून थाळीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. सिलिंडरचे सातत्याने वाढत असलेले दर तसेच भाज्या, खाद्यतेल यांच्याही दरात दररोज वाढ होत आहे. ही सर्व महागाई वाढल्याने आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी जेवणाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. – सुधीर घाग, स्वाद पोळीभाजी केंद्र, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा