शोभेसाठी किंवा हौस म्हणून काही घरात फिश टँक पाहायला मिळतात. अलीकडे साधे मासे ठेवण्याऐवजी ज्या माशांना बाजारात मूल्य जास्त आहे अशा माशांचे वास्तव्य घरातील फिश टँकमध्ये असते. काही माशांचे बाजारातील मूल्य जास्त आहेच, शिवाय वास्तुशास्त्राच्या दृष्टीने या माशांना अधिक महत्त्व आलेले आहे. यापैकीच आपल्या विशिष्ट गुणांमुळे ग्राहकांना आकर्षित करणारा आणि वास्तुशास्त्रासाठी महत्त्वपूर्ण असणारी माशांची प्रजात म्हणजे आरवाना मासा. दक्षिण अमेरिका येथे ब्राझीलच्या अ‍ॅमेझोन खोऱ्यात आरवाना माशाची मूळ प्रजात अस्तित्वात आली. मात्र आशिया खंडात मलेशिया, थायलंड या ठिकाणी या प्रजातीचा विकास झाला. आठ ते दहा जाती असलेला हा आरवाना मासा घरासाठी शुभ मानला जात असल्याने गुड लक फिश अशी या माशाची ओळख आहे. घरामध्ये फिश टँकमध्ये दिसणारा हा मासा बहुतांश वेळा याच उद्देशाने पाळला जातो. भारतामध्ये मात्र आरवाना माशाची प्रजात फारशी विकसित झालेली नाही. परदेशात मात्र मोठय़ा प्रमाणात या माशाचे ब्रीिडग केले जाते. ‘स्केलरोपेजेस फोर्मोसस’ अशी आरवाना माशाची शास्त्रीय ओळख आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकर्षक रंग आणि इतर माशांपेक्षा वेगळी गुणवैशिष्टय़े यामुळे आरवाना मासा लोकप्रिय आहे. रेड टेल गोल्ड ज्याला आर.टी.जी. असेही म्हणतात, गोल्ड क्रॉस बॅक, जर्दिनी आरवाना, ग्रीन आरवाना, हाय बॅक गोल्ड, सिल्वर आरवाना अशा विविध नावांनी आरवाना ब्रीड ओळखले जाते. वेगवेगळ्या रंगात हा मासा उपलब्ध असल्याने रंगाप्रमाणे या माशाचे नाव बदलते. या माशाचे ब्रीिडग करणे कठीण असल्याने तज्ज्ञ व्यक्तींकडूनच आरवाना माशाचे ब्रीिडग होत असते. भारतात केवळ सिल्वर आरवाना या जातीचा मासा लोकप्रिय आहे.

विषम संख्येत एकत्र राहण्याचे रहस्य?

आरवाना मासा घरातील फिश टँकमध्ये दिसला तरी या माशाला मोठय़ा तळ्यात ठेवणे अधिक सोयीचे असते. साधारण एक ते दीड गुंठय़ाच्या जागेत एका वेळी सात मासे एकत्र ठेवावे लागतात किंवा विषम संख्येत हे मासे तळ्यात एकत्र ठेवले जातात. विषम संख्येत एकत्र ठेवण्याचे कारण उलगडले नसले तरी शास्त्रीयदृष्टय़ा या गोष्टीला महत्त्व आहे. स्वभावाने रागीट असल्याने या माशांनी एकमेकांवर आघात केल्यास पळायला मुबलक जागा मिळण्यासाठी मोठय़ा तळ्यात हे मासे ठेवले जातात.

वॉटर मंकी.

आरवाना माशाला पाण्याबाहेर मोठी उडी मारण्याची सवय असते. म्हणूनच या माशांना वॉटर मंकी असेही म्हणतात. डॉल्फिन माशाप्रमाणे हे मासे पाण्याबाहेर येऊन उंच उडी मारून श्वास घेऊन पुन्हा पाण्यात जातात. तळ्याच्या काठावर एखादे झाड असेल त्यावर त्यांना आपले भक्ष्य सापडले तर पाण्याबाहेर उडी मारून आपले भक्ष्य ते पकडतात. पाण्याच्या तळाशी गेलेले खाद्य या माशांना खायला आवडत नाही. हवेत फिरणारे कीटक, गप्पी मासे, गांडूळ, पाण्यावर तरंगणारे खाद्य या माशांना खायला आवडते.

मायक्रो चिपिंग असणारा मासा

जगभरात वितरित होणाऱ्या आरवाना माशाच्या शरीरात मायक्रो चिपिंग केले जाते. या माशाची वैशिष्टय़े, माशाचे ब्रीड कोणते आहे, हे ब्रीड कोणी विकसित केले अशी सर्व माहिती मायक्रो चिपमध्ये साठवली जाते आणि ही मायक्रो चिप या माशाच्या शरीरात बसवली जाते. त्यामुळे इतर देशांत वितरित होणाऱ्या माशाबद्दल इत्थंभूत माहिती तज्ज्ञांना मिळते. भारतात अशा प्रकारचे मायक्रो चिपिंग केले जात नाही. या माशाचे ब्रीिडग करणाऱ्या तज्ज्ञांना संबंधित प्रमाणपत्र दिले जाते. हे ब्रीड भारतात विकसित व्हायला जास्त वेळ लागेल, असे फिश ब्रीडर प्रतीक पाटील यांनी सांगितले.

तोंडात अंडय़ांचे रक्षण

आरवाना माशाचा नर आणि मादी सहसा ओळखता येत नाही. या माशांच्या पिल्लांबद्दल विशेष म्हणजे मादीने अंडी घातल्यावर नर ही अंडी साधारण चार ते सहा आठवडे आपल्या तोंडात ठेवून अंडय़ांचे रक्षण करतो. अंडय़ातून पिल्ले बाहेर आल्यावर नर आपल्या तोंडातून या पिल्लांना पाण्याच्या जगात प्रवेश देतो. ज्यांना या माशाचे ब्रीडिंग करायचे असते ते तज्ज्ञ मोठय़ा तळ्यातून नर माशाला शोधून काढतात त्यानंतरच आरवाना माशाचे ब्रीिडग केले जाते.