ग्रंथालय असे असावे,जिथे साहित्याचा मनमुराद आनंद लुटता यावा. ग्रंथालय असे असावे, जिथे विविध लेखकांच्या लेखणीचा आस्वाद घेता यावा. असे असावे ग्रंथालय, जिथे जुन्या पुस्तकांच्या सुगंधासोबत नव्या पुस्तकांचा दरवळ असावा. जिथे व्यवस्थापन असावे आणि वाचकांचा विश्वास असावा. या गुणांनी परिपूर्ण ग्रंथालय जेव्हा वाचकांना उत्कृष्ट ग्रंथसेवा पुरवते, तेव्हा खऱ्या अर्थाने ग्रंथालयाबद्दल आपसुकच वाचकांच्या मनात आपुलकी निर्माण होते. वाचक ग्रंथालयाला आपलेसे करतात आणि प्रारंभ होतो पुस्तक, वाचक यांच्या अतूट मैत्रीचा. बदलापूरमधील निसर्ग ट्रस्टचे ‘ग्रंथसखा ग्रंथालय’ असेच वाचकांना ग्रंथसेवेच्या माध्यमातून आपलेसे करणारे ग्रंथालय आहे.
लहानपणापासूनच वाचनाची आवड असणाऱ्या श्याम जोशी यांनी ग्रंथसखा ग्रंथालयाच्या माध्यमातून नागरिकांना शाश्वत पुस्तकांचा अमूल्य साठा उपलब्ध करून दिला आहे. आपले वडील आणि भाऊ यांच्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली आणि ही वाचनाची आवड केवळ स्वत:पुरती मर्यादित न ठेवता इतरांनाही वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी श्याम जोशी यांनी हे ग्रंथालय उभारले आहे. सुरुवातीला वडील, भाऊ आणि स्वत:कडील पुस्तकांचा संग्रह करून १० हजार पुस्तकांच्या मदतीने श्याम जोशी यांनी २००४ मध्ये निसर्ग ट्रस्ट स्थापन केले आणि ग्रंथज्ञानाचा प्रारंभ केला. निसर्ग ट्रस्टच्या या ग्रंथालयाचे दोन भागांत वर्गीकरण करण्यात आले. कथा, कादंबऱ्या यासाठी असणारे ग्रंथालय आणि संशोधनासाठी उपयुक्त असणारे ग्रंथालय असे ग्रंथालयाचे दोन विभाग आहेत.
केवळ वाचन संस्कृतीची जोपासनाच नव्हे तर मराठी भाषा वाचविणे हे या ग्रंथालयाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रंथालयात प्रवेश केल्यावर विविध प्रकारची पन्नासपेक्षा अधिक नियतकालिके वाचकांच्या नजरेस पडतात. काव्य, कथा, ऐतिहासिक, चरित्रे, स्त्री साहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तके बाराखडीनुसार मांडून ठेवलेली आहेत. वाचक त्यांना हवे असलेले पुस्तक स्वत: निवडून घेऊ शकतात. काही इंग्रजी पुस्तकांचा भरणा ग्रंथालयात आहे. सध्या ग्रंथालयात एक लाख पुस्तके आहेत. निसर्ग ट्रस्टच्या ग्रंथालयाचा दुसरा विभाग स्वायत्त मराठी विद्यापीठाचा आहे. मराठी भाषेविषयी अभ्यास आणि संशोधन करण्यासंदर्भात ही जागा आदर्श आहे. मराठी, भाषा, इतिहास, संस्कृती, संशोधन आदी विषयांची अडीच लाख पुस्तके स्वायत्त विद्यापीठाच्या संग्रहात आहेत. ख्रिस्ती साहित्य, बौद्ध साहित्य, संशोधनविषयक ग्रंथ, अनेक जुने दिवाळी अंक, दुर्मीळ साहित्य याचा एकत्रित संगम अनुभवायचा असेल आणि वाचनातून आपल्या ज्ञानाच्या कक्षा उंचवायच्या असतील तर विद्यापीठात पुस्तकांच्या सान्निध्यात वेळ घालवायला हवाच. ग्रंथालयाला शासनाचे अनुदान नाही. पुस्तके ही सामाजिक आहेत. ग्रंथालय चालवणे हे जनतेचे काम आहे, शासनाचे नव्हे, समाजाने पुढाकार घेऊन ग्रंथालयाची परंपरा जपायला हवी या जाणिवेतून श्याम जोशी सरकारी अनुदान घेत नाहीत. सभासदांच्या वर्गणीवर आणि काही दानशूर देणगीदारांच्या देणगीतून ग्रंथालयाचा कारभार सुरू आहे. ५० वर्षे पुस्तकांच्या सान्निध्यात राहिल्याने श्याम जोशी आपल्या अनुभवाने पुस्तकांची निवड स्वत: करतात. दरवर्षी हजारो पुस्तकांची खरेदी केली जाते. सध्या वाचनाची आवड असूनही पुस्तक वाचण्यासाठी वाचकांना सवड मिळत नाही. त्यामुळे पुस्तके ठरावीक कालावधीत परत आणून द्यावीत असे नियम किंवा दंड ग्रंथालयात नाही. ८० रुपये महिना वर्गणी आणि २०० रुपये अनामत रक्कम सभासदांसाठी आहे. वाचकांवर विश्वास हे तत्त्व ग्रंथालयाने पाळलेले आहे.
विद्यापीठात प्रवेश करताना भिंतींवर लावलेली पुस्तकांची माहिती देणारी पत्रके काही वेळ आपल्याला त्याच ठिकाणी घुटमळत ठेवतात. प्रत्यक्ष विद्यापीठात प्रवेश केल्यावर खरा वाचक या पुस्तकांच्या दुनियेत हरवून जाईल असा अद्वितीय संग्रह या ठिकाणी पाहायला मिळतो. भिंतींवर काही पूर्वीच्या काही संपादकांची, जुन्या लेखकांची छायाचित्रे नावासहित लावण्यात आलेली आहेत.
ग्रंथसेवेला उपक्रमांची जोड
ग्रंथालयातर्फे अक्षरसंध्या हा वाचक कट्टा दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भरवला जातो. पुस्तक, लेखक, पुस्तकाच्या गुणवत्तेबद्दल या कट्टय़ामध्ये चर्चा केली जाते. १० एप्रिल ते १० जून या दरम्यान लहान मुलांसाठी बालवाङ्मय हा उपक्रम राबवला जातो. यात बालवाचकांना विनामूल्य पुस्तके वाचण्यास उपलब्ध करून दिली जातात. मराठीसाठी भरीव योगदान देणाऱ्या पी.जे. जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दर २२ सप्टेंबरला व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. दिवाळी अंकाच्या चार हजार प्रती ग्रंथालयात उपलब्ध असतात.
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2015 रोजी प्रकाशित
ज्ञान, विज्ञान आणि मनोरंजनाचा संगम
ग्रंथालय असे असावे,जिथे साहित्याचा मनमुराद आनंद लुटता यावा. ग्रंथालय असे असावे,
Written by झियाऊद्दीन सय्यद

First published on: 09-12-2015 at 02:13 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about library in badlapur