मुरबाड आणि शहापूर तालुक्यांतील गावांत पाण्याच्या नियोजनासाठी अविरत कार्य करत आहे. लोकजागृती, लोकशिक्षण आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीचे पालन करीत संपूर्ण ग्रामीण परिवर्तनाचा वसा या संस्थेने घेतला आहे. वृक्षारोपण करणे, ग्रामीण भागात रोजगारपूरक शिक्षण देणे, अन्य सुविधा पुरवत गावकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचे काम हाती घेतलेल्या या संस्थेविषयी महाराष्ट्र दिनी घेतलेला हा आढावा..
वसुंधरा संजीवनी मंडळ
सर्वाधिक पाऊस आणि समृद्ध जलसंपदा असलेले मुरबाड आणि शहापूर हे तालुके. तानसा, वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा आणि बारवी ही धरणे याच तालुक्यांत आहेत. मुंबई, नवी मुंबईसह, ठाणे, डोंबिवली शहरांत याच तालुक्यातून पाणीपुरवठा होत असतो. मात्र शहरांना पाणीपुरवठा नियमित आणि मुबलक होत असला तरी या तालुक्यातील गावात पावसाळी भातशेतीनंतर दुबार शेतीला पाणी उपलब्ध नाही.
शहापूर तालुक्यातील ९२ गावे टँकरग्रस्त आहेत. पाणीटंचाईमुळे आजही या गावांतील महिला पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करतात. या भागातील पाणीटंचाई नवीन नसली तरी पाणीसाठय़ासाठी भरीव काम करण्याच्या उद्देशाने ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’च्या वतीने वनराई बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. संस्थेच्या मार्गदर्शनाने आणि स्थानिक लोकसहभागातून ४० वनबंधारे बांधण्यात आले. संस्थेचे हे काम राज्यस्तरावर आदर्श ठरले. शेती बंधारे, शोषखड्डे, तलावांचे, नदीचे पुनरुज्जीवन यांसारखी कामे करत ग्रामीण परिवर्तनाच्या कामात संस्थेने गावात पाण्याचा साठा करण्यावर विशेष कामगिरी केली. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कनकवीरा नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाचाही या संस्थेला हातभार लागला आणि कनकवीरा नदी पुन्हा जिवंत झाली. या नदीच्या दोन्ही बाजूला झाडे लावण्याचे काम संस्थेच्या वतीने करण्यात आले. संस्थेच्या प्रामाणिक कामाची दखल घेत वन विभागानेही या कामात पुढाकार घेऊन मोठय़ा प्रमाणात वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. तळवली आदिवासी आश्रम शाळेत संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या कामाचा आढावा पाहून या शाळेतील १०० मुलांनी संस्थेचे काम पूर्ण करण्याची शपथ घेतली. गावागावांत ग्रामीण उद्योजकता प्रशिक्षण वर्ग, महिला उद्योजकता प्रशिक्षण वर्ग संस्थेतर्फे राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागात अनेक मुलींना लांब पल्ल्यावरून प्रवास करून शाळा, महाविद्यालयांत यावे लागते. यासाठी पुढाकार घेऊन व्हॉट्सअॅपवर जुन्या सायकली देण्याचे आवाहन केले. जवळपास ७० सायकली शहरातून ग्रामीण भागातील मुलींसाठी दाखल झाल्या. या सायकली व्यक्तिगत पातळीवर न देता संबंधित संस्थेला देण्यात आल्या. गावात दहा शिवणयंत्रे पुरवण्यात आली. आठवी ते दहावी इयत्तेतील मुलींना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर या प्रशिक्षणामुळे स्वयंरोजगार उपलब्ध झाला.
पाणी नसल्यामुळे गावात रोजगारनिर्मिती होऊ शकत नव्हती. कुक्कुटपालन होऊ शकत नव्हते. शिक्षण होत नव्हते. गावकऱ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दुग्धव्यवसाय सुरू केला. पण गावकऱ्यांच्या दुधाला गावात मागणी नव्हती. संस्थेने काळाप्रमाणे पावले टाकत अमूल कंपनीला गावात बोलावून त्यांच्याकडे दुधाची विक्री सुरू केली आणि मुरबाड, शहापूर तालुक्यांतील गावकऱ्यांना दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला.
शिक्षक प्रशिक्षणाच्या निमित्ताने गावात फिरलेले संस्थेचे सदस्य आनंद भागवत सांगतात, या गावात फिरल्यावर इथल्या भीषण परिस्थितीची जाणीव झाली आणि त्यातून काम सुरू झाले. गेल्या एप्रिल महिन्यात संस्थेला दोन वर्षे पूर्ण झाली. संपूर्ण ग्रामीण परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या या संस्थेने १ मेच्या शुभमुहूर्तावर वृक्षारोपणासाठी खड्डे खणायला सुरुवात केली आहे. ५ जूनपर्यंत पाच ते सहा हजार खड्डे खणण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेच्या या कार्यात अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक जाणीव राखून काम करताना गरजवंतांना उपकाराची सवय न लावता स्वयंपूर्ण बनवण्याच्या संस्थेच्या या कार्याचा गौरव सर्व स्तरांवर होत आहे.
वृक्ष लागवडीचा उपक्रम
शहराच्या वेशीवर वसलेल्या गावांमध्ये काँक्रिट जंगलाचा प्रवेश होण्याची भीती आहे. यात वृक्षांची बेसुमार तोड केली जाते. म्हणून वृक्षसंपत्ती वाढविण्यावर भर देण्यात आला. वृक्ष सतत वाढत राहिले पाहिजे. यासाठी वसुंधरा संजीवनी मंडळाच्या माध्यमातून वृक्ष रोपांच्या लागवडीसाठी खड्डे खणण्याच्या कामाचा शुभारंभ झाला. ग्रामीण परिवर्तनातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.