नदी म्हटले की डोळ्यासमोर अद्भुत निसर्ग उभा राहतो. निसर्गाने निर्माण केलेली जीवनवाहिनी म्हणजे नदी! मात्र मुंबईतील मिठी नदी ही नाव घेतले की डोळ्यासमोरील चित्र क्षणार्धात बदलते आणि नाक मुरडणारी गटारगंगा उभी राहते. आधुनिकीकरणाची आणि प्रगतीची कास धरलेल्या माणसाने या नदीची गटारगंगा केली. या नदीकाठचा परिसरही किळसवाणा आणि निसर्गाचा मागमूस नसलेला. मात्र याच नदीच्या काठी उभे राहिलेले ‘महाराष्ट्र निसर्ग उद्यान’ म्हणजेच माहीम नेचर पार्क हा जणू कचराकुंडीतील स्वर्ग आहे, असा भास होतो. हे निसर्गउद्यान म्हणजे मानवी कल्पनेतून आणि अफाट मेहनतीतून साकार झालेला ‘हिरवा’ प्रकल्प. हजारो झाडे, वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक असलेले हे निसर्गउद्यान म्हणजे मुंबईचा अद्भुत नजारा.

धारावी झोपडपट्टीच्या बाजूला असलेले हे निसर्ग उद्यान १९९४मध्ये साकार झाले. ज्या जागेवर आज उद्यान आहे, तिथे पूर्वी कचराभूमी (डम्पिंग ग्राउंड) होती. झाडे नसलेल्या या ३५ ते ४० एकर उकिरडय़ावर पर्यावरणप्रेमींच्या अफाट कल्पनेतून निसर्गउद्यान साकार झाले. ‘जागतिक वन्यजीव निधी’ (वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड) आणि ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ सलिम अली यांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि १९८४ ते १९९४ या दशकाच्या कालखंडात अगदी नरकातून स्वर्ग निर्माण झाला. त्यासाठी मिठी नदीच्या स्वच्छतेची मोहीमही हाती घेण्यात आली, मिठी नदीच्या काठी अगदी खारफुटीचे जंगल उभारण्यात आले.

आज महाराष्ट्र निसर्ग उद्यानात तब्बल १४ हजार झाडे आहेत, त्याशिवाय विविध प्रकारची ३०० वनस्पती, त्यापैकी काही फुलझाडे, औषधी वनस्पती आहेत. या उद्यानात विविध स्थलांतरित पक्षी येतात. विविध फुलपाखरू पाहण्यासाठी बालकांची येथेच नेहमी गर्दी होते. या उद्यानात केवळ शोभेसाठी झाडे लावलेली नाहीत, तर या झाडांची आणि या उद्यानाची माहिती देण्यासाठी येथे तज्ज्ञ आहेत. कोणत्या प्रकारची झाडे आहेत, त्यांचा उपयोग, फुले व फळे यांची माहिती, कोणत्या झाडांवर कोणते पक्षी, फुलपाखरे बसतात, औषधी वनस्पतींचे महत्त्व आदी माहिती तज्ज्ञांमार्फत दिली जाते.

या निसर्ग उद्यानात झाडांच्या संवर्धनासाठी एक तलावही बनविण्यात आला आहे. अर्धा एकर परिसरात वसविण्यात आलेला हा तलाव या उद्यानाचे खास आकर्षण. निसर्गाच्या सान्निध्यातील या तलावाजवळ अनेक पक्षी आढळतात. सकाळी सकाळी तर येथे किलबिलाट चालू असतो. या तलावातील पाणी माणसाला पिण्या योग्य नसले तरी प्राणी, पक्ष्यांसाठी ते पिण्या योग्य आहे. उद्यानातील झाडांना याच तलावातील पाण्याचा उपयोग होतो. ‘मुंबईचे फुफ्फुस’ असलेल्या या उद्यानात येताक्षणीच गारवा जाणवतो. बाहेरचे तापमान आणि या उद्यानातील तापमान यांच्यात खूपच फरक जाणवतो. ऐन उन्हाळय़ातही येथे थंडगार वातावरण असल्याने पर्यटकांना येथे उद्यानसफर करण्यास आवडते.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या या उद्यानात दररोज अनेकजण भेटी देतात. शालेय विद्यार्थ्यांची तर येथे नेहमीच वर्दळ असते. मुलांना निसर्ग समजून देण्यासाठी अनेक पालक आपल्या मुलांना या उद्यानात फेरफटका मारायला घेऊन येतात. छायाचित्रकारांसाठी तर येथे पर्वणीच असते. शेकडो छायाचित्रकार येथे भेटी देत असतात. या निसर्ग उद्यानातील कार्यालयात या उद्यानाबाबत माहिती मिळतेच, त्याशिवाय उद्यानाच्या प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रमही राबविले जातत. छायाचित्रकारिता, मधमाशी पालन, शेतीविषयक माहिती आदी उपक्रम येथे राबविण्यात येत आहेत.

सध्या सीमेंटचे जंगल बनलेल्या मुंबईत निसर्ग टिकवून ठेवणे कठीण झाले आहे. आधुनिकतेची कास धरलेल्या मुंबईकरांची निसर्गाचे जतन करणे हे जबाबदारी आहे. आज माहीम येथील हे निसर्ग उद्यान पर्यावरणतज्ज्ञ आणि या उद्यानासाठी झटणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे आजही टिकून आहे. ही हिरवी निसर्गसंपदा यापुढे टिकेल, अशी आशा करू या!

महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहीम कसे जाल?

  • मध्य रेल्वेवरील शीव आणि पश्चिम रेल्वेवरील माहीम या रेल्वे स्थानकाबाहेरून टॅक्सीने या निसर्गउद्यानाजवळ जाता येते.

Story img Loader