कल्याण – केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पातील कल्याण-डोंबिवली ते ठाणे-वसई जलमार्गावरील नऊ थांब्यांपैकी भिवंडी जवळील काल्हेर खाडी किनारी पाणतळ (जेट्टी) बांधण्याची निविदा प्रक्रिया महाराष्ट्र सागरी मंडळाने सुरू केली आहे. २२ कोटी ३० लाख ४३ हजार २३० रुपये खर्चाचे हे काम असणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे आदेश दिल्यानंतर ठेकेदाराला १८ महिन्यांच्या अवधीत पाणतळ बांधणीचे काम पूर्ण करायचे आहे, असे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागातील नोंदणीकृत व या कामाचा अनुभव असलेला ठेकेदार या कामासाठी नियुक्त केला जाणार आहे. केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय सागरी जलमार्गाची संकल्पना पुढे आली आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलमार्गांना प्राधान्य देण्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे धोरण आहे. या जलमार्गासाठी पर्यावरण प्राधिकरणांच्या मागील वर्षी मंजुऱ्या मिळाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी, ठाणे खाडी, पालघर जिल्ह्यातील वसई खाडीतून जलमार्ग प्रस्तावित आहे. राज्य, केंद्र सरकार, पर्यावरण प्राधिकरणांच्या आवश्यक परवानग्या मिळाल्याने महाराष्ट्र सागरी महामंडळाच्या माध्यमातून लवकरच या जलमार्गावरील पाणतळांच्या कामांना प्रारंभ होणार आहे, असे अधिकारी म्हणाला.
महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मागील वर्षीच्या बैठकीत महाराष्ट्र सागरी महामंडळाने दाखल केलेल्या सागरमाला प्रकल्पातील कल्याण-वसई जलमार्गाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्रातील ५४० किमी लांबीचा सागरी किनारा जलवाहतुकीसाठी उपयोगात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने आठ वर्षांपूर्वी घेतला. डोंबिवली, ठाणे, मिरा-भाईंदर ते वसई भाग जल वाहतुकीने जोडला तर रस्ते, रेल्वे वाहतुकीवर येणारा ताण कमी होईल. नागरीकरण भागाला त्याचा लाभ होईल. हा विचार या प्रकल्पामागे आहे.
जलमार्ग उभारताना खाडी किनारच्या जैवविविधतेला धोका पोहचणार नाही याची काळजी घेण्याचे कठोर निर्देश पर्यावरण प्राधिकरणांनी सागरी मंडळाला दिले आहेत. हा जलमार्ग मार्गी लागावा म्हणून राज्याचे माजी बंदर विकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
डोंबिवली जवळील खाडीची खोली उथळ आहे. ही खोली ५० मीटर करण्यासाठी सुमारे ८० कोटींचा खर्च येणार होता. हे शक्य नसल्याने जलमार्गाचा प्रस्ताव लालफितीत अडकला होता. डोंबिवली थांब्यासाठी खा. शिंदे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. कल्याण, डोंबिवली, काल्हेर, ठाणे, कोलशेत, घोडबंदर, गायमुख, मिरा-भाईंदर, वसई येथे थांबे प्रस्तावित आहेत. जल वाहतुकीने रस्ते, रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होईल. मध्य-पश्चिम रेल्वे भाग जल वाहतुकीने जोडल्याने डोंबिवली, बदलापूर, कल्याण, ठाणे भागातील प्रवासी वसई, विरार, डहाणू परिसरात योग्य वेळेत पोहचेल. या कामासाठी एक हजार कोटी निधी प्रस्तावित आहे. कल्याण-वसई जलमार्ग लवकर सुरू व्हावा यासाठी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील आहेत.