ठाणे नॅचरल सोसायटीचा उपक्रम; वटपौर्णिमेला सुवासिनींना रोपटय़ांचे वाटप
निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा वृक्ष असणाऱ्या वडाच्या सान्निध्यात वर्षभरातून किमान एकदा तरी महिलांनी यावे, या हेतूने खरेतर वटपौर्णिमेची प्रथा पडली. मात्र आधुनिक काळात हा मूळ अर्थ लोप पावून फक्त कर्मकांड उरले. वडाच्या झाडाजवळ जाण्याऐवजी त्याच्या फांद्या घरी आणून पुजण्याचे बोकाळलेले फॅड आता वडाच्या मुळावर आले आहे. या पाश्र्वभूमीवर यंदा ठाण्यात वटपौर्णिमेनिमित्त वटरोपांचे रोपण करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असून ठाणे नॅचरल सोसायटीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
शहरात पदपथांवर, इमारतींच्या सज्ज्यांवर, रस्त्यांच्या कडेला वडाची रोपे उगवितात. वडाच्या या रोपांचे जतन करून ठाणे नॅचरल सोसायटी शहरातील महिलांना विनामूल्य देत आहे. महिलांनी या वटरोपांचे जतन करावे, इतकीच अपेक्षा असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक कौस्तुभ देवरसे यांनी दिली. विशेष म्हणजे संस्थेतर्फे नियमितपणे या वटवृक्षांची पाहणीही केली जाणार आहे.
शहरातील देशी झाडांची संख्या दरवर्षी कमी होताना दिसून येत आहे. वड, पिंपळ, आंबा, जांभूळ यांसारखी देशी झाडे शहराच्या ‘विकासा’त अडथळा ठरतात. त्यामुळे या मोठय़ा झाडांवर कुऱ्हाड चालवली जाते. त्याऐवजी परदेशी वृक्षांची लागवड केली जाते. मात्र पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ती पुरेशी नाहीत. त्यामुळे देशी झाडांची संख्या वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे देवरसे यांनी सांगितले.
वटवृक्ष हा आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. झाडे संतांसमान असतात. ती स्वत: ऊन, पावसात उभी राहून आपणास, पशु-पक्ष्यांना निवारा देत असतात. मात्र आता वाढत्या बाजारीकरणामुळे हा निवारा नष्ट केला जात आहे. वटपौर्णिमेच्या पाश्र्वभूमीवर शहरातील वडाच्या फांद्यांवर या ‘झाड माफियांची’ नजर असते. एक दिवस आधी बाजारात या फांद्यांची चढय़ा दराने विक्री केली जाते. असे गेली अनेक वर्षे सुरू आहे. मात्र वन विभाग आणि महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग त्याकडे कानाडोळा करतो.
वडाच्या झाडांमुळे हवेत मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. शिवाय जमिनीची धूप थांबते. विपुल प्रमाणात वडाची झाडे असणाऱ्या प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पर्यावरण रक्षणात वड महत्त्वपूर्ण आहे.
झाडाच्या फांद्या वाऱ्याने पडून माणसांना इजा होऊ नये यासाठी छाटणी केली जाते. मात्र आताच्या परिस्थितीमध्ये पूजेसाठी फांदी तोडणे अत्यंत चुकीचे आहे. वटपौर्णिमेच्या पुजेसाठी फांदी विकत घेण्याएवजी एखादे लहानसे वडाचे रोपटे लावा. जेणे करून हा बाजारही थांबेल आणि ते रोप मोठे झाल्यावर त्याचे झाड तयार होईल. पैशाने फांदी विकत घेता येईल, परंतु निसर्गाचे नुकसान मात्र पैशांनी भरून आणणे शक्य नाही. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे ही सर्वस्वी आपली जाबाबदारी आहे, त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
सीमा हर्डीकर, फर्न पर्यावरण संस्था