डोंबिवली पूर्व ठाकुर्ली, कचोरे, पत्रीपूल, चोळे भागात दहशत निर्माण करुन चोऱ्या, दरोडे टाकणारा सराईत गुन्हेगाराला टिळकनगर पोलिसांनी पत्रीपुला जवळील कचोरे गाव हद्दीतून शनिवारी रात्री अटक केली. सराईत गुन्हेगार असल्याने त्याला ठाणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्या आदेशाचा भंग करुन हा गुन्हेगार गुपचूप डोंबिवलीत कचोरे भागात येऊन वास्तव्य करत होता.

सिकंदर नुरमहंम्मद बगाड (२२) असे गु्न्हेगाराचे नाव आहे. तो डोंबिवली जवळील पत्रीपुला जवळील न्यू गोविंदवाडी, भारत नगर, खोली क्रमांक १५२, डोंबिवली पूर्व) येथे राहत होता. सन २०१२ पासून ते २०२० पर्यंत सिकंदरवर टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजविणे, जबरी दुखापत करणे, शस्त्राचा वापर करणे, दरोडा टाकणे, चोऱ्या करणे असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा – टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

सिकंदरला यापूर्वी पकडून पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर, न्यायालयीन कारवाई केली होती. जामिनावर बाहेर येऊन तो पुन्हा चोऱ्या करत होता. त्याच्या या गुन्हेगारीमुळे पोलिसांनी सिकंदरवर पाच वेळा प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. कारवाई करुनही सिकंदर दाद देत नसल्याने कल्याण पोलीस उपायुक्तांनी ऑक्टोबर २०२० मध्ये सिकंदरला ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

ठाणे जिल्ह्यात फिरण्यास मनाई असताना सिकंदर पोलिसांची नजर चुकवून पुन्हा डोंबिवलीत कचोरे भागात येऊन पुन्हा चोऱ्या सुरू केल्या होत्या. टिळकनगर हद्दीतील ९० फुटी रस्त्यावर पुन्हा लुटमार, चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास करताना आणि गणेशोत्सवापूर्वी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी झोपडपट्टी, चाळी भागात छापे टाकून धरपकड मोहीम सुरू केली आहे. ही कारवाई करताना टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार सिकंदर पुन्हा मनाई आदेशाचा भंग करुन डोंबिवलीत कचोरे भागात येऊन गुप्तपणे राहत असल्याची माहिती मिळाली.

साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या आदेशावरुन साहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बाकले, उपनिहीक्षक अजिंक्य धोंडे, श्याम सोनावणे, हवालदार गोरखनाथ घुगे, रामेश्वर राठोड यांच्या पथकाने कचोरे भागात सापळा लावून सिकंदरला शिताफीने अटक केली. जिल्हा हद्दपारीचा आदेश मोडल्याने पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करुन जिल्हा हद्दीच्या बाहेर जाण्याचे आदेश काढले आहेत.