विशाखापट्टणम येथे अलीकडेच झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनात’ राष्ट्रपतींच्या युद्धनौकेचा मान मिळालेल्या ‘सुमित्रा’ युद्धनौकेची धुरा प्रथम श्रेणी कमांडर मिलिंद मोकाशी यांनी सांभाळली. कमांडर मोकाशी हे डोंबिवलीकर रहिवासी आहेत.
नौदलाच्या कवायतींवेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह लष्कराचे उच्चाधिकारी ‘सुमित्रा’ युद्धनौकेवर चार ते पाच तास संचलन निरीक्षणासाठी होते.
सुमित्रा युद्धनौकेचे सारथ्य करणारे कमांडर मोकाशी हे या युद्धनौकेचे पहिले कमांिडग (फर्स्ट कॅप्टन) अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीचे डोंबिवलीकरांकडून विशेषत्वाने कौतुक होत आहे. मिलिंद मोकाशी यांचा जन्म डोंबिवलीत झाला. मोहन मोकाशी हे त्यांचे वडील. डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरातील प्रत्येक सदस्य उच्चशिक्षित होता, पण लष्करी सेवेत कोणीही नव्हते. मिलिंद यांनी वर्तमानपत्रातील लष्करी गणवेशात असलेल्या सैन्याबद्दलची आकर्षक जाहिरात वाचली. आपणही सैन्यात भरती व्हावे, असा विचार त्यांच्या मनाला स्पर्शून गेला. औरंगाबाद येथील ‘सव्र्हिलेट प्रीपरेटरी संस्थेत’ लष्करी शिक्षण घेण्याचा निर्णय मिलिंद यांनी घेतला. सातारा येथील पूर्वपरीक्षा मिलिंद उत्तीर्ण होऊन औरंगाबाद येथील ‘एसपीआय’ संस्थेत दाखल झाले. त्या वेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत निवृत्त अॅडमिरल मनोहर औटी यांनी मिलिंद यांना ‘सैन्याच्या कोणत्या दलात जायला तुम्हाला आवडेल’ असा प्रश्न केला. त्यावर मिलिंद यांनी ‘मला तुमच्यासारखेच नौदलात दाखल व्हायला आवडेल,’ असे तत्पर उत्तर दिले.
जून १९९१ पासून मिलिंद यांच्या लष्करी शिक्षणाचा औरंगाबाद येथील संस्थेतून श्रीगणेशा झाला. घरापासून दूर, कडक शिस्त अशा वातावरणाशी जुळून घेताना सुरुवातीला खूप त्रास झाला. कोणत्याही परिस्थितीत हे अडथळे पार करायचे, ही जिद्द त्यांनी बाळगली होती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, भोपाळ येथील शारीरिक क्षमतेच्या परीक्षा उत्तीर्ण झाले. सांगलीच्या वालचंद हिराचंद महाविद्यालयात मिलिंद यांना अभियांत्रिकी शाखेसाठी प्रवेश मिळाला होता. त्याकडे पाठ फिरवून नौदलात जाण्याचा मिलिंद यांचा आग्रह कायम होता. आईच्या खंबीर पाठिंब्यावर ते गोवा येथील ‘नेव्हल अॅकॅडमी’मध्ये दाखल झाले. बी.एस्सी. पदवी, त्याचबरोबर नौदलाचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले.
कोची येथे ‘कॅडेट ट्रेनिंग शिप इन्स टीर’वर प्रशिक्षण घेतले. तीर, घडियाल, सावित्री, बेल्वा, म्हैसूर या युद्धनौकांवर त्यांनी प्रशिक्षण घेतले व काम केले. २००० मध्ये गनरी ऑफिसर (द्वितीय) म्हणून ‘आयएनएस विपुल’ नौकेवर ते दाखल झाले.
‘शौर्यचक्र’ने सन्मान
गेल्या दोन वर्षांपासून मिलिंद ‘सुमित्रा’ युद्धनौकेवर कमांडिंग अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एडनच्या आखातात समुद्री चाचांच्या बंदोबस्ताच्या मोहिमेत ते सक्रिय होते. येमेनच्या युद्धभूमीत अडकलेल्या सोळाशे भारतीयांची सुटका करण्यासाठी त्यांची ‘सुमित्रा’वर नेमणूक झाली. ही जोखमीची जबाबदारी कौशल्याने पार पाडल्याबद्दल त्यांचा गेल्या वर्षी ‘शौर्यचक्र’ बहुमान देऊन सन्मान करण्यात आला.