कल्याण- कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये नियमित घनकचरा विभागाकडून शहराचा प्रत्येक कोपरा साफ केला जातो की नाही याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी कल्याण शहराचा दुचाकीवरून पाहणी दौरा केला.यावेळी घनकचरा विभागाचे अधिकारी त्यांच्या सोबत होते. कल्याण, डोंबिवली शहरे कचरा मुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहिमा सुरू आहेत. दिवाळीतही शहराच्या प्रत्येक भागात स्वच्छता असली पाहिजे. शहरात नियमित स्वच्छता केली जाते की नाही याची पाहणी करण्यासाठी मंगळवारी अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी अचानक कल्याण शहराच्या वसंत व्हॅली, मोहन अल्टिझा, विद्यापीठ रस्ता, गोदरेज हिल रस्ता, जेल रस्ता, बिर्ला महाविद्यालय रस्ता भागाची पाहणी केली
काही ठिकाणी चितळे यांना कचरा दिसला. त्यांनी अशाप्रकारे कोठेही कचरा दिसता कामा नये, अशा सूचना केल्या. दैनंदिन शहरातील कानेकोपरे स्वच्छ झालेच पाहिजेत, अशा सूचना चितळे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, उपमुख्य स्वच्छता अधिकारी मोहिनीश गडे, अविनाश मांजरेकर उपस्थित होते. डोंबिवलीतही अशीच पाहणी केली जाणार आहे.