कल्याण- साथ आजाराच्या रुग्णांची संख्या कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत अधिक संख्येने वाढत आहे. या रुग्णांना आणि कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल रुग्णांना पालिकेकडून योग्य वैद्यकीय सुविधा दिल्या जातात की नाही याची पाहणी शुक्रवारी भाजपच्या कल्याण मधील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.या पाहणीनंतर साथीच्या वाढत्या आजारांना तोंड देण्यासाठी प्रशासन कमी पडत असल्याची माहिती भाजपचे कल्याण शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी दिली. प्रशासनाने मात्र साथ आजारांना तोंड देण्यासाठी तत्पर वैद्यकीय सुविधा रुग्णालये, पालिका आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करुन दिल्या आहेत. खासगी रुग्णालयात दाखल साथ आजाराच्या रुग्णांची माहिती घेऊन तो रुग्ण राहत असलेल्या भागात जंतुनाशक फवारणी केली जाते, असा दावा केला.
डेंग्यु, मलेरिया ग्रस्त रुग्ण रुक्मिणीबाई रुग्णालयात अधिक संख्येने दाखल आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा, डाॅक्टरांची कमतरता जाणवत आहे. गोरगरीब, झोपडपट्टी भागातील सर्वाधिक रुग्ण खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नाहीत म्हणून पालिका रुग्णालयात दाखल होतात. त्यांना तत्पर वैद्यकीय सुविधा मिळालीच पाहिजे, असे शहराध्यक्ष पाटील यांनी सांगितले.रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या जागी प्रशस्त सर्वोपचारी रुग्णालयाची गरज आहे. राज्यात युतीचे सरकार आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या हा विषय निदर्शनास आणला जाईल. शासनस्तरावर कल्याण डोंबिवली पालिकेसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>>डोंबिवलीत वाढदिवसाच्या दिवशी वडिलांची पत्नी, मुलांना मारहाण
पाटील यांनी रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्ष, भांडार कक्ष, लहान मुलांचे, महिलांच्या कक्षाची पाहणी केली. रुग्णांना उपलब्ध वैद्यकीय सुविधांमध्ये तत्पर सेवा द्या, अशी सूचना वरुण पाटील यांनी पालिका डाॅक्टरांना केली.यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मंगला वाघ, कल्याण पश्चिम विधानसभा संयोजक स्वप्निल काठे, जिल्हा सचिव रितेश फडके, जिल्हा सचिव निर्मला कदम, महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती भोईर उपस्थित होते.