कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्ड्यांवरुन नागरिकांच्या संतापाच्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. हा सूर अगदीच टिपेला पोहचून नागरी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच शहरातील खड्डे सुस्थितीत बुजविले जातात की नाही याची पाहणी करण्यासाठी पालिकेच्या शहर अभियंत्यांसह प्रमुख अभियंते सोमवारी दुचाकीवरुन शहराच्या विविध भागात फिरले.
शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. रस्त्यावरील खड्डे वातानुकूलित वाहनात बसून योग्यरितीने दिसत नाहीत. ते तंत्रशुध्द पध्दतीने ठेकेदार भरतो की नाही हे कळत नाही, त्यामुळे शहर अभियंता अहिरे यांनी कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, उपअभियंता शाम सोनावणे, कनिष्ठ अभियंता संजय आचवले यांच्या साथीने शहर परिसराचा पाहणी दौरा केला. शहरातील खड्ड्यांची परिस्थिती जाणून घेतली.
मागील पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने कडोंमपा हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांमुळे वाहन कोंडी, प्रवाशांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी खड्ड्यांमुळे कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी टीकेचे लक्ष्य झाले होते. तत्कालीन शहर अभियंता सपना कोळी यांच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसला होता. अशाप्रकारे जहरी टीका होण्यापूर्वीच शहरातील रस्ते सुस्थितीत, तंत्रशुध्द पध्दतीने भरण्यात यावेत म्हणून शहर अभियंता अहिरे यांनी दुचाकीवरुन खड्ड्यांची पाहणी केली.
हेही वाचा >>> कल्याण : शिळफाटा रस्त्यावर गोळवलीजवळ लोखंडी सळ्यांचा वाहनांना धोका
ठेकेदारांना तंत्रशुध्द पध्दतीने खड्डे भरण्याच्या सूचना केल्या. जगदीश कोरे यांच्या दुचाकीवर शहर अभियंता अहिरे बसले होते. कल्याण मधील लालचौकी, खडकपाडा, पारनाका, निक्कीनगर, कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चिंचपाडा, काटेमानिवली, तिसगाव, मलंग रस्ता, डोंबिवलीत एमआयडीसी, शहरांतर्गत रस्त्याची पाहणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. पावसाने विसावा घेतला असल्याने या कालावधीत तात्काळ काँक्रीट मिश्रित खड्डे भरण्याच्या सूचना ठेकेदारांना अहिरे यांनी केल्या. खड्डे भरणीच्या कामावर प्रभागातील अभियंत्यांनी लक्ष ठेवण्याच्या सूचना अहिरे यांनी केल्या. खड्डे भरणीत हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला.