लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या अटकेनंतर या प्रकरणाशी येथील तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचा काही सहभाग आहे का. डोंबिवलीतील विकासक विनोद किसन म्हात्रे यांनी पालिका नगररचना विभागात दाखल केलेल्या इमारत आराखडा प्रस्तावात भूमिअभिलेख विभागाचा बनावट नकाशा, तेथील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या, शिक्के यांचा सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी तालुका भूमिअभिलेख कार्यालयात शोध कार्याचा हुकूम घेऊन जाऊन भूमिअभिलेख कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली.

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांनी कल्याण डोंबिवली पालिकेतील नगररनचा विभागातील प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. मंगळवारी बाजारपेठ पोलिसांचे पथक गांधारे भागातील भूमिअभिलेख कार्यालयात पोहचताच तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

आणखी वाचा-कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सात लाखाहून अधिक वृक्ष, दोन हजार ६५० वारसा वृक्षांचा समावेश

तालुका भूमिअभिलेख अधिकारी नितीन साळुंखे यांना पोलिसांनी कार्यालयातील कडोंमपा नगररचना विभागाशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यासंदर्भातचा हुकूम दाखविला. भूमिअभिलेख विभागाने पूर्ण सहकार्य करून पोलिसांना विकासक विनोद किसन म्हात्रे, भूमापक बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल प्रकरणाशी सर्व कागदपत्रे दाखवली.

विकासक विनोद म्हात्रे यांची डोंबिवलीतील महाराष्ट्रनगर मधील इमारत उभारताना त्यांनी पालिकेच्या नगररचना विभागाला भूमिअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांची स्वाक्षरी, शिक्क्यांचा वापर करून बनावट मोजणी नकाशा सादर केला होता. या नकाशाची स्थळपाहणी करणे नगररचना विभागातील भूमापक बहिराम, बागुल यांचे काम होते. हे काम भूमापकांनी योग्य केले आहे की नाही याची खात्री करून विनोद म्हात्रे यांचा बांधकाम आराखडा मंजूर करून घेणे हे तत्कालीन नगररचनाकार राजेश मोरे, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर आडके यांचे काम होते. पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी भूमापकांच्या सर्वेक्षण नकाशाकडे दुर्लक्ष केले. बहिराम यांनी विनोद यांच्या जमिनलगतची सहा गुंठे गुरचरण जमीन विनोद यांच्या मालकीत दाखवून बनावट नकशा तयार केला. गुरचरण जमीन निदर्शनास आणणे हे बहिराम यांचे काम होते. या गुंतागुंतीमुळे पोलिसांनी भूमि अभिलेख कार्यालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणाशी संबंधित आहे का. ही बनावट मोजणी नकशा कागदपत्रे विकासक, भूमापकाने कशी तयार कली याचा पोलीस तपास करत आहेत.

आणखी वाचा-कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी एकत्रित बस सेवेचा विचार; आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांची माहिती

आडके हे फरार आहेत. याप्रकरणाशी संबंधित नगररचना अधिकारी निलंबित करा. या आणि १५ वर्ष नगररचनात ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करा, अशी मागणी तक्रारदार रमेश पद्माकर म्हात्रे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of records in land records office by police in case of arrest of kdmc urban planning staff mrj