ठाणे : ठाण्यातील तीन महत्त्वाच्या उड्डाणपुलांचे संरचनात्मक परिक्षण मुंबई आयआयटी मार्फत केले जात आहे. यामध्ये कळवा येथील जुना खाडीपुल, ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेतील सॅटीस पुल आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेरील उड्डाणपुलाचा सामावेश आहे. मुंबई आयआयटीने अहवाल दिल्यानंतर या पुलांच्या दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. येत्या १५ ते २० दिवसांत हा अहवाल येण्याची शक्यता आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.
ठाणे शहरातील वाहतुक समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील पश्चिमेला सॅटीस उड्डाणपुल, ठाणे – कळवा शहराला जोडणारा कळवा खाडी पुल आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेर उड्डाणपुल उभारले आहेत. यातील सॅटीस पुलावरूनन ठाणे महापालिकेच्या बसगाड्या, राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांची वाहतुक होते. तर कळवा खाडी पुलावरून नवी मुंबई, मुंब्रा, कळवा आणि विटावा भागातून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणारी हलकी वाहने धावतात. मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेरील मार्गिका अरुंद आहे. तसेच स्थानक परिसरात अतिक्रमण आहेत. यामुळे मुंब्रा स्थानक परिसरात देखील उड्डाणपुल असून हा उड्डाणपुल शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरतो. हे तिन्ही उड्डाणपुल वाहतुकीसाठी महत्त्वाचे असले तरी १० वर्षांहून अधिक जुने झाले आहेत. त्यामुळे या उड्डाणपुलांच्या संरचनात्मक परिक्षणाचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. त्यानुसार, महापालिकेने सुमारे दोन महिन्यांपुर्वी संरचनात्मक परिक्षाणासाठी मुंबई आयआयटीला कळविले होते. मागील २० दिवसांपासून या तिन्ही उड्डाणपुलांचे संरचनात्मक परिक्षण मुंबई आयआयटीने सुरू केले आहे. येत्या २० दिवसांत या संरचनात्मक परिक्षणाचा अहवाल ठाणे महापालिकेला प्राप्त होणार आहे. या अहवालामध्ये सूचविलेल्या बदलानुसार उड्डाणपुलांची दुरूस्ती केली जाणार आहे. तसेच इतर काही बदल असल्यास त्यांचीही दुरुस्ती महापालिकेकडून केली जाणार आहे.
हेही वाचा – ठाणे : जमिनीच्या वादातून माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला
याबाबत महापालिकेच्या अभियंत्यांना विचारणा केली असता, त्यांनी मुंबई आयआयटीचे संरचनात्मक परिक्षण सुरू असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असल्याची माहिती नाव छापू नये या अटीवर सांगितली.