गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी पालिका, पोलीस, महावितरण विभागांसह गणेश मंडळ प्रतिनिधींची बैठक घेतली असून त्यापाठोपाठ आयुक्त आज, बुधवारी शहरातील गणेश विसर्जन घाटांचा पाहणी दौरा करणार आहेत. यामध्ये विसर्जन घाटांवरील व्यवस्थेचा आढावा घेऊन त्यात आणखी काय सुधारणा करायला हवी, याबाबतच्या सूचना आयुक्त देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी पालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप तसेच व्यासपीठ उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अर्ज सादर करण्यासाठी प्रभाग समितीमधील नागरी सुविधा केंद्रांवर एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले होते.
तसेच गणेश मुर्ती आगमन आणि विसर्जनदरम्यानची सुविधा, तेथील व्यवस्था आणि भेडसावणाऱ्या समस्या अशा व्यथा मंडळांचे प्रतिनिधींनी पालिका तसेच पोलिस प्रशासनापुढे मांडल्या होत्या. त्यावर या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त बुधवारी विसर्जन घाटांचा पाहणी दौरा करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेणार या दौऱ्यात ते उपवन तलाव, कोलशेत, पारसिक रेतीबंदर, मुंब्रा, मासुंदा तलाव या भागांची पाहणी करणार आहेत, अशी माहीती पालिका सूत्रांनी दिली.