खरोखरच संताप येणारी गोष्ट होती. प्रत्यक्ष जन्मदात्री आईच आपल्या मुलीला वेश्यव्यवसायात ढकलू पाहात होती. त्या मुलीच्या मित्राला तिची असहायता पाहवत नव्हती. त्याने तिला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि गीता महाजन यांचे ठाण्यातील वृंदावन येथील घर गाठले. त्यानंतर चक्र फिरले. त्या मुलीची आईच्या तावडीतून सुटका करण्यात आली. सध्या ती मुलगी व तो मुलगा लग्न करून आनंदाने राहत आहेत. वेश्याव्यवसायात अडकलेल्या, अडकवू पाहणाऱ्या, हुंडाबळी, नवऱ्याकडून होणारा छळ अशा एक ना दोन अनेक समस्यांचा आघात झेलणाऱ्या अश्राप महिलांना व मुलांना समाजात ताठ मानेने जगविण्यास शिकविणाऱ्या गीता महाजन व त्यांची ‘भारतीय महिला संघटना’ यांचे काम अद्भुतच म्हणावे लागेल.
दुसरा एक किस्सा अंगावर काटा आणणारा आहे. पुण्यातील एका सुशिक्षित घरातील व्यक्तीने कर्जबाजारीपणातून व्यसनाचा ‘आश्रय’ घेतला. घरातील छळाला कंटाळून अवघ्या सात दिवसांच्या बाळाला घेऊन त्याची पत्नी आई-वडिलांच्या घरी गेली तर ‘घरच्यांनी देणेकरी उद्या आपल्या दारात येतील’ म्हणून त्या असहाय मुलीला पुणे रेल्वे स्टेशनवर नेऊन सोडून दिले. या महिलेला ‘भारतीय महिला संघटने’ने आधार दिला. आज ती स्वत:च्या पायावर उभी आहे. ठाणे जिल्ह्य़ातील अशा हजारो महिला व मुलींचा आधार बनून भारतीय महिला संघटनेची वाटचाल सुरू आहे. हा प्रवास एका रात्रीचा नाही. जगाच्याच इतिहासाचे अवलोकन केल्यास जवळपास प्रत्येक देशात स्त्रियांना आपल्या हक्कांसाठी लढावे लागल्याचे दिसून येईल. अगदी अमेरिकेसारख्या देशातही एके काळी महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता व त्यातून त्यांची मोठय़ा प्रमाणात पिळवणूक होत होती. भारतात गरिबी, शिक्षण, तसेच आपल्या हक्काची पुरेशी जाणीव नसल्यामुळे महिलांची मोठय़ा प्रमाणात पिळवणूक होत असते. बलात्कारासारख्या घटना राजरोस घडत असतात. अनेकदा अल्पवयीन मुलीवरील बलात्कारानंतर घरच्यांकडून या मुलीला टाकून देण्यात येते तर नवऱ्याने मारहाण करणे स्वाभाविक असल्याची मानसिकता आजही ग्रामीण भागातील महिलांमध्ये, त्यातही कष्टकरी वर्गात मोठय़ा प्रमाणात दिसून येते.
गीता महाजन यांच्यासारख्या अनेक महिला या महिलांवरील अन्यायाविरोधत पेटून उठून समाजात ठोस काम करताना दिसतात. एम.एस्सी. केल्यानंतर आयआयटी मुंबई येथे त्या पी.एचडी. करीत होत्या. तो काळ आणीबाणीचा होता. आयआयटीमधील काही विद्यार्थी सामाजिक प्रश्नांक डे वळले. गीता महाजन त्यापैकी एक. त्यांचा अभ्यासाचा विषय केमिस्ट्री होता. प्रत्यक्षात समाजसेवेच्या केमिस्ट्रीशी त्याचे नाते जुळले ते कायमचेच. यातूनच ‘भारतीय महिला फेडरेशन’ची शाखा त्यांनी १९८५ पासून ठाण्यात सुरू केली. जागतिक महिला संघटनेने १९७५ ते ८५ हे जागतिक महिला दशक जाहीर केले. त्याच काळात क्युबामधील परिषदेच्या निमित्ताने गीता महाजन तेथे गेल्या. तिसऱ्या जगातील महिलांच्या प्रश्नांचा या काळात त्यांनी अभ्यास केला. पुढे भारतात परतल्यानंतर स्त्री मुक्ती संघटनेच्या ‘मुलगी झाली हो’ या नाटकाचे अनेक प्रयोग त्यांनी प्रामुख्याने ठाणे जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी केले. केवळ महिलांचे प्रश्न समजावून घेणे अथवा कौन्सिलिंग करणे या पलीकडे जाऊन त्यांना प्रत्यक्ष आधार देण्यावर त्यांनी भर दिला. मेघना मेहेंदळे, मंगला चितळे, क्रांती जेजुरीकर, सुनीता कुलकर्णी, वसुधा नातू, हर्षां पवार, अनिता साबळे, मंगला लिमये आदींचा यात मोठा वाटा असल्याचे गीता महाजन यांनी आवर्जून सांगितले. गेल्या काही वर्षांत महिलांमधील अत्याचारात वाढ होत असतानाच आता महिलाही महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी बऱ्यापैकी पुढे येत असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. प्रामुख्याने आमच्या संघटनेकडे चांगल्या घरातील सुशिक्षित महिला काम करण्यासाठी येत असून गरीब घरातील मुलींना शिकविण्यासाठी ‘दिशा’ नावाचा प्रकल्प सुरू केल्यामुळे मुलींमधील ड्रॉपआऊटचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामात नवीन मंडळी अधिक उतरल्यास झोपडपट्टी अथवा गरीब वस्त्यांमधील मुलांमधील शिक्षणाचे प्रमाण वाढून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येईल. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ्च्या वाटचालीत गीताताईंनी स्वत:च्या घरासह आठ-दहा कार्यालयांच्या माध्यमातून काम केले. अनेकदा कार्यकर्त्यांचे घर हेच कार्यालय बनून महिलांच्या समस्यांवर काम चालते. पुढे अहिल्या रांगणेकर यांच्या प्रेरणेतून केंद्र शासनाच्या समाजकल्याण मंत्रालयाकडून संस्थेला निधी मिळाला. यातून ठाणे येथील चरईमधील केंद्राला मदत मिळते. पुढे कल्याण व भिवंडी येथे केंद्र सुरू करण्यात आले. बदलापूर येथे वीस वर्षांपूर्वी मालती वैद्य ट्रस्टच्या वतीने मिळालेल्या जागेत समाजाने टाकलेल्या महिलांना आधार देण्यास सुरुवात केली. तीनशेहून अधिक महिलांची येथे आजपर्यंत राहण्याची व्यवस्था करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील महिलांचे प्रश्न, अल्पवयीन मुलींची विक्री, नवऱ्याने टाकून देणे, मारझोड करणे, आर्थिक प्रश्न, घरकाम करणाऱ्या महिलांचे प्रश्न तसेच बारगर्ल्सच्या समस्या अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर भारतीय महिला संघटना काम करीत आहे. यासाठी वेळोवेळी पोलिसांची मदत घेतली जाते. पोलिसांनाही प्रशिक्षण देण्याची तसेच महिलांच्या प्रश्नांकडे सामाजिक बांधिलकीच्या नजरेतून पाहायला शिकविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. यासाठी पोलीस आयुक्तालय अथवा ठाण्यात वेळोवेळी पथनाटय़, कायदेविषयक ज्ञान आदी उपक्रम राबविले जातात. स्त्रीभ्रूण हत्या ही एक मोठी समस्या आहे. यातून आईच्या गर्भात मुलीची हत्या करणाऱ्यांना रोखण्याचे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यासाठी ‘चला, अन्याया सामोरे’ आणि ‘आम्हाला वाढू द्या, जगू द्या’सारखी नाटके तयार करून त्याचे शेकडो प्रयोग केले. बीजिंग येथे जागतिक महिला परिषदेतही गीताताई सहभागी झाल्या होत्या. एखाद्या महिलेवर ज्या ठिकाणी अत्याचार होतो, तेथे जाऊन पुढील काही काळ सभा घेऊन लोकांमध्ये त्या घटनेविषयी जागृती ठेवण्याचे कामही संस्थेच्या माध्यमातून केले जाते. गीताताईच्या म्हणण्यानुसार महिलांच्या समस्येला गरिबी, अत्याचार व धर्माधता प्रामुख्याने कारणीभूत आहे. खरे तर भारतातच नव्हे तर एकूणच जगात स्त्रीच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहिले गेले तर बहुतेक प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकेल. पण अशी दृष्टी बाळगण्यास ‘अच्छे दिन’वालेही तयार नाहीत. गेल्या चार वर्षांत संस्थेने घरकाम करणाऱ्या मोलकरणींची संस्थाही उभी केली. ठाणे जिल्ह्य़ात सुमारे तीन हजार महिला या संस्थेच्या सभासद बनल्या आहेत. संघटनेने किशोरवयीन मुलींची शिबिरे, शाळेतील मुला-मुलींसाठी निबंध स्पर्धा, पोलिसांमध्ये महिलांच्या समस्येविषयी सतर्कता तसेच गरीब वस्तीमधील मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था असे अनेक उपक्रम राबवून महिलांच्या समस्यांचा सामना करण्याचे काम अखंडपणे चालवले आहे.
पत्ता- महिला समस्या निवारण केंद्र, हिरा कृष्णा अपार्टमेंट, चरई, ठाणे, पश्चिम.
दूरध्वनी- २५३६९८७९, किंवा
गीता महाजन-९९८७५४४०७४.
संदीप आचार्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा