बदलापूर : गणेशोत्सवाने जाती, धर्म, पंथ आणि भौगोलिक सीमान कधीच ओलांडल्या आहेत. समाजाच्या विविध घटकांकडून गणरायाची स्थापना करत त्याची मनोभावे पुजा केली जाते. समाजाने कायमच दूर ठेवलेल्या तृतीयपंथीही बदलापुरात उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात. गेल्या 25 वर्षांपासून बदलापूर पूर्वेतील म्हाडा वसाहतीच्या संभाजी नगरात तृतीयपंथीय गणेशाची स्थापना करतात. आसपासच्या शहरातील तृतीयपंथी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होत असतात. त्यामुळे या गणेशाची जिल्ह्यात चर्चा असते.

तृतीयपंथी समाज समाजातील विविध सण उत्सवांपासून दूर राहतो. समाजाच्या आनंदाच्या क्षणी शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या या समाजाला काही ठिकाणी मानाचे स्थान दिले जाते. तर काही ठिकाणी त्यांनी दूरच ठेवले जाते. मात्र असे असले तरी या तृतीयपंथींयांनी कायमच समाजाच्या आनंदात आपला आनंद मानला आहे. सध्या सुरू असलेला गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही.

हेही वाचा : ‘मी शिवसेना बोलते’, शिंदे गटाविरोधातील देखावा पोलिसांकडून जप्त; महाआरती करत गणेशोत्सव मंडळाने नोंदवला निषेध

बदलापूर शहरातील पूर्व भागात असलेल्या म्हाडा वसाहतीतील संभाजी नगर भागात तृतीयपंथीयांचे वास्तव्य आहे. मात्र या तृतीयपंथीयांनी गणेशोत्सवाला आपलेसे करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा गेली 25 वर्षे टिकवली आहे. गणपती बाप्पासोबतच तृतीयपंथीयांसाठी पुजनी असलेल्या यलम्मा देवीची पुजाही यावेळी केली जाते. या काळात आसपासच्या अंबरनाथ, वांगणी, उल्हासनगर, कल्याण, ठाणे या शहरातून तृतीयपंथी एकत्र येत असतात. या काळात भंडाऱ्याचे आयोजन केले जाते.

हेही वाचा : ‘शहाड रेल्वे स्थानकात ‘एमपीएससी’ करणाऱ्या विद्यार्थ्यांची धावत्या मालगाडीखाली आत्महत्यालोकसत्ता टीम

विविध वर्गातले लोक या उत्सवात सहभागी होत असतात. रात्री बाराच्या ठोक्याला गणेशाची पुजा केली जाते. तर दीड दिवस मनोभावे देवाची पुजा चालते. गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या या निमित्ताने तृतीयपंथी एकत्र येत साजर करत असलेल्या या गणेशोत्सवाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होते आहे.

Story img Loader