ठाणे : ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिकांच्या १२९ शाळेच्या ७७ इमारतींमध्ये ९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. या कामाच्या निविदा पालिका प्रशासनाने काढल्या असून येत्या काही महिन्यात हे कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.

ठाणे महापालिकेमार्फत शहरात १०६ प्राथमिक आणि २३ माध्यमिक अशा एकूण १२९ शाळा चालविण्यात येतात. या शाळा पालिकेच्या ७७ इमारतींमध्ये भरविण्यात येतात. या शाळांमध्ये २८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बदलापुर येथील शाळेत घडलेल्या प्रकारानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या नंतर ठाणे महापालिका प्रशासनाने पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांसोबत घेतलेल्या एका बैठकीत यासंबंधीचे आदेश दिले होते. ठाणे महापालिकेच्या अनेक शाळांची बांधकामांची अवस्था निकृष्ट असून मध्यंतरी शाळांच्या डागडुजीची कामेही महापालिकेने सुरू केली होती. डागडुजी झालेल्या नव्या इमारतीत सुरक्षा उपायांचे आढावा घेण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले होते.

ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये यापूर्वी २६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे केवळ शाळांच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात आले आहेत. शाळेच्या इतर परिसरात मात्र कॅमेरे बसविण्यात आलेले नव्हते. यामुळे इतर भागात दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत होती. त्याठिकाणीही कॅमेरे बसविण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर शाळेत आणखी किती कॅमेऱ्याची गरज आहे आणि कोणत्या ठिकाणी कॅमेरे बसविले जावेत याची माहिती घेतली जात होती. याशिवाय, पालिका विद्युत विभागानेही शाळा परिसराची पाहणी करून कॅमेरे कुठे बसवावे लागतील आणि किती कॅमेऱ्याची गरज आहे, याचा आढावा घेतला होता.

या कामासाठी अडीच कोटी रुपयांच्या कामाचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. हे कॅमेरे शाळेतील शौचालयांचे बाहेरील परिसर, मैदान, वंराडा, पॅसेज, जिने आणि इतर महत्वांच्या ठिकाणी बसविले जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. याशिवाय शाळांच्या प्रवेशद्वाराबाहेर आणखी काही ठिकाणी कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे का याचीही चाचपणी केली जात आहे. मात्र या निविदांमध्ये त्याचा समावेश नाही अशी माहिती सुत्रांनी दिली.

या कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून येत्या काही महिन्यात हे कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. हे काम वेगाने व्हावे यासाठी आयुक्त सौरभ राव यांचेे निर्देश आहेत.- शुभांगी केसवानी,उपनगर अभियंता (विद्युत), ठाणे महापालिका