ठाणे : सॅटीस पुलावर प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच गावदेवी बस थांब्याचा वापर नागरिकांकडून केला जावा, यासाठी काही बसगाड्यांची वाहतूक गावदेवी भागातून करण्याचा निर्णय ठाणे परिवहन उपक्रमाने घेतला आहे. शास्त्रीनगर, उपवन, गावंडबाग आणि शिवाईनगर या बसगाड्यांच्या फेऱ्या आता गावदेवी बस थांब्यावरून होणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेतील सॅटीस पुलावरून दररोज टिएमटी बसगाड्यांची वाहतूक शहराच्या विविध भागांत सुरू असते. सॅटीस पुलावरील सर्वच बस थांब्यांवर सकाळी आणि रात्रीच्या वेळेत प्रवाशांच्या मोठ्या रांगा असतात. या गर्दीमुळे अनेकदा प्रवाशांना वेळेत बसगाड्या उपलब्ध होत नाहीत. बसगाड्यांच्या प्रतिक्षेत प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. तर दुसरीकडे गावदेवी येथे महापालिकेचा मोठा बस थांबा आहे. या बस थांब्यावरून पूर्वी बसगाड्यांची वाहतूक होत होती. ही जागा तशीच पडून आहे. अनेकदा येथे अतिक्रमणाचे प्रयत्न झाले होते. प्रशासनाने येथील अतिक्रमण हटवून हा भाग मोकळा केला. या जागेचा वापर वाढावा आणि सॅटीस पुलावरील प्रवाशांची होणारी गर्दी कमी व्हावी, यासाठी टिएमटीने शास्त्रीनगर, शिवाईनगर, उपवन आणि गावंडबाग भागात होणारी बसगाड्यांची वाहतूक गावदेवी मार्गे करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवारपासून येथील वाहतूक होणार आहे. गावदेवी येथून शास्त्रीनगर, उपवन, गावंडबाग आणि शिवाईनगर येथील बसगाड्यांची वाहतूक सुरू झाली तर सॅटीस पुलावरील प्रवशांचा भार हलका होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ठाणे: वेळेत जेवण दिले नाही म्हणून एकावर कोयत्याने हल्ला
हेही वाचा – ठाण्यात हवा प्रदूषण करणाऱ्या १३२ वाहनांवर कारवाई
सॅटीस पुलावर प्रवाशांच्या रांगा वाढत आहेत. तसेच गावदेवी येथील बसथांब्याची जागाही उपलब्ध आहे. त्यामुळे शिवाईनगर, शास्त्रीनगर, उपवन आणि गावंडबाग येथील बसगाड्यांची वाहतूक गावदेवी बसथांब्यावरून केली जाणार आहे. – भालचंद्र बेहेरे, परिवहन व्यवस्थापक, टिएमटी उपक्रम.