ठाणे : करोनाच्या चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारच्या बैठकीत दिले. आरटीपीआर चाचण्यांची संख्या वाढविणे, रेल्वेस्टेशन, बसस्थानके तसेच गर्दीच्या ठिकाणी करोना चाचणी केंद्रे सुरू करावेत. पार्किंग प्लाझा आणि व्होल्टास या कोविड रुग्णालयांत सर्व तयारी ठेवणे, औषधसाठा, साफसफाई, लसीकरण याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होऊ लागली असून शहरात दररोज शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व उपायुक्तांसह सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली.

शहरात लसीकरणाबाबत हरघर दस्तक ही मोहीम सुरू असून ती मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी. तसेच करोनाचा सामना करण्यासाठी सर्वानी मुखपट्टी वापरणे गरजेचे असून याची अंमलबजावणी सर्व कार्यालयांच्या आस्थापनांमध्ये करण्याच्या सूचना त्यांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या. तसेच गर्दीच्या ठिकाणी रेल्वेस्थानक, बसस्थानक या ठिकाणी आरटीपीसीआर केंद्रे सुरू करावीत. त्याचप्रमाणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची साफसफाई दिवसांतून चार ते पाच वेळा करुन घ्यावी. गृहसंकुलांमध्ये करोनाबाधित रुग्ण सापडल्यास त्या ठिकाणच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी नागरिकांमध्ये करोनाच्या चौथ्या लाटेबाबत ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती करण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी यावेळी केली.  करोनाच्या चौथ्या लाटेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी लावणे, सामाजिक अंतर नियमांचे पालन करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे आहे.

कोविडवर मात करण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे, ज्या नागरिकांचे अद्याप एकही लसीकरण झाले नाही अथवा बूस्टर डोस झालेला नाही, त्यांनी तात्काळ लसीकरण करुन घ्यावे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून‘हर घर दस्तक’ ही मोहीम सुरू असून महापालिकेचे कर्मचारी घरी आल्यास त्यांना सहकार्य करावे व ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांनी तात्काळ लसीकरण करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे.

Story img Loader