बदलापूर : बुधवारी बदलापूर शहरात रात्रीच्या सुमारास झालेल्या रासायनिक वायु गळतीची तीव्रता रात्री १२ वाजेपर्यंत बदलापूर पश्चिमेपर्यंत पोहोचली होती. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या बदलापूर केंद्रात रात्री नऊच्या सुमारास या नायट्रोजन डायऑक्साईडची (NO2) नोंद झाली असून रात्री ८ नंतर एका तासात हा निर्देशांक ५६ वरून ३२५ पर्यंत पोहोचल्याची नोंद या केंद्रात झाली आहे. त्यामुळे नेमका कोणत्या कंपनीतून या नायट्रोजन डायऑक्साईडची गळती झाली हे तपासण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळापुढे आहे.
बुधवारी रात्री नऊ नंतर शहरातील पूर्व भागात असलेल्या खरवई औद्योगिक वसाहतीच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना डोळे चुरचुरणे आणि श्वसनास त्रास जाणवला. अनेकांनी बाहेर येऊन पाहताच या परिसरात रासायनिक वायू पसरल्याचे दिसून आले. या वायूची तीव्रता इतकी होती की धुके पडल्याप्रमाणे दिसून येत होते. त्य़ामुळे दृश्यमानताही कमी झाली होती. रात्री अकरापर्यंत पूर्वेतील सर्वच भागात हा वायू पसरला होता. तर रात्री १२ वाजेपर्यंत बदलापूर पश्चिमेतील मांजर्ली, बेलवली भागातही वायू पसरल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. हा रासायनिक वायू मोठ्या प्रमाणावर कंपनीमधून एकतर गळती झाला किंवा कंपन्यातून जाणीवपूर्वक सोडण्याच आल्याचा आरोप होतो आहे.
हेही वाचा…ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने बदलापुरातील पूर्वेत कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या जुन्या मुख्यालयात प्रदुषण पाहणी यंत्रणा बसवली आहे. यामध्ये पीएम २.५, पीएम १०, नायट्रोजन डायऑक्साईड यासह इतर घटकांची नोंद केली जाते. बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत या यंत्रणेत नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण अवघे ५६ मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतके होते. मात्र त्यानंतर अचानक नायट्रोजन डायऑक्साईडचे प्रमाण थेट ३२५ पर्यंत पोहोचले, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. त्यामुळे हा नायट्रोजन डायऑक्साईड वायूच हवेत पसरल्याचा संशय बळावला आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात नायट्रोजन डाय़ऑक्साईड़ कोणत्या कारणामुळे पसरला हे स्पष्ट होऊ शकले नाही.
हेही वाचा…वायु गळती प्रकरणी गुन्हा दाखल; टिनको कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
एकीकडे थंडी वाढण्यासोबत हवेतील धुळ वाढल्याचे गेल्या काही दिवसात दिसून आले आहे. सोबतच वातावरणातील तापमानवाढीनंतर अचानक आलेल्या थंडीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहे. सर्दी, खोकल्यासह श्वसनाचे आजार बळावत आहेत. अशा स्थितीत बदलापुरात पसरणाऱ्या रासायनिक वायूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेंद्र राजपूत यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.