ठाण्यातील के. सी. अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘डेट्रॉक्स’ हा टेक फेस्ट आणि ‘रिफ्लेक्शन’ हा आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव सोमवार, ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या निमित्ताने विज्ञान-तंत्रज्ञानातील नवनवीन प्रयोगांचे दर्शन टेक फेस्टच्या निमित्ताने ठाणेकरांना घडणार आहे. या महोत्सवात होणाऱ्या रोब वॉर, रोबो रेस, रोबो सॉपर, पिक अ‍ॅण्ड प्लेस यांसारख्या रोबोंच्या स्पर्धेसाठी महाविद्यालय सज्ज झाले आहे, तर सांस्कृतिक फेस्टच्या निमित्ताने रॉक बॅण्ड, संगीत, नृत्य आणि फॅशन शो अशा विविध कलांचा आविष्कार महाविद्यालयामध्ये घडणार आहे. गुरुवार, १२ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव रंगणार आहे.
पंधरा हजारांहून अधिक तरुणांचा सहभाग, तीन हजारांहून अधिक स्पर्धक, एक हजार अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थी, आठशेहून अधिक व्यवस्थापनाचे विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन के. सी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्चच्या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणातून दुर्मीळ कार रॅलीने फेस्टिव्हलची सुरुवात होणार आहे. त्यानंतर रोबोच्या विविध स्पर्धा, व्हिडीओ गेम्स स्पर्धाची रेलचेल महाविद्यालयामध्ये सुरू होईल. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातील. या महोत्सवामध्ये ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमधील महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत. रिफ्लेक्शन महोत्सवाच्या निमित्ताने कोशीश आणि प्रिझम या रॉक बॅण्डचा कलाविष्कार सादर होणार आहे. रॉक बॅण्डबरोबरीनेच नृत्य, संगीत, फॅशन शोचे होईल. खाणाऱ्यांसाठी फुडीज इव्हेण्ट आणि स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे, तर पथनाटय़ातून जागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्नही या महोत्सवातून होऊ शकणार आहे, अशी माहिती  प्रसिद्धिप्रमुख सौरक्ष करंबळेकर यांनी दिली.

Story img Loader