कल्याण डोंबिवली शहरातील अंतर्गत रस्ते कोंडीमुक्त असले पाहिजेत म्हणून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आणि वाहतूक विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत रस्त्यांवर वर्षानुवर्ष भंगारासारखी उभी असलेली वाहने उचलून ती कल्याण मधील आधारवाडी कचराभूमीवर नेऊन टाकली जात आहेत.
हेही वाचा >>>प्रस्तावित भूमिगत मेट्रोमुळे जुन्या ठाण्याचा पूनर्विकास रखडला ?
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेचे प्रभारी आयुक्त मंगेश चितळे यांनी शहरातील सर्व रस्ते स्वच्छ आणि वाहन कोंडी मुक्त असले पाहिजेत असे आदेश आरोग्य, साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. रस्त्यांवर एकही भंगार, अपघातग्रस्त, धूळखाव वाहन दिसता कामा नये. या वाहनांमुळे सकाळच्या वेळेत पालिका सफाई कामगारांना वाहने उभी असलेल्या भागात रस्ता सफाई करता येत नाही. वर्षानुवर्ष भंगार वाहने एकाच जागी उभी असल्याने त्या वाहनांखाली कचरा साचतो. रात्रीच्या वेळेत या भंगार वाहनांचा दुरुपयोग केला जात असल्याच्या तक्रारी पालिकेत वाढत होत्या.प्रभारी आयुक्त चितळे यांनी पालिका हद्दीतील सर्व मुख्य, अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरत असलेली अनेक महिने, वर्ष एकाच जागी उभी असलेली सर्व भंगार वाहने उचलण्याचे आदेश प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. पालिकेने वाहतूक विभागाच्या साहाय्याने ही वाहने उचलण्याची मोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा >>>कल्याण डोंबिवली पालिकेच्या ठेकेदाराकडून ३४ लाखांची वीज चोरी
मंगळवारी दिवसभरात डोंबिवलीतील फ प्रभाग हद्दीतील टिळक चौक ते घरडा सर्कल वर्दळीच्या रस्त्यावरील दुतर्फा अनेक महिने उभी असलेली एक रिक्षा, सात दुचाकी ही बेवारस वाहने उचलून आधारवाडी कचराभूमीवर नेण्यात आली. यावेळी फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भरत पाटील, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते उपस्थित होते. अशाच पध्दतीने डोंबिवली जीमखाना रस्त्यावरील सात बेवारस वाहने उचलण्यात आली.टिटवाळा विभागात उपायुक्त धैर्यशील जाधव, उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे, अतिक्रमण नियंत्रण पथक, वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्दळीच्या, अंतर्गत रस्त्यांवरील भंगार पध्दतीने उभी असलेली रिक्षा, दुचाकी, ट्रक सारखी वाहने उचलून आधारवाडी कचराभूमीवर नेण्यात आली.
हेही वाचा >>>ठाणे : उल्हासनगर पालिकेविरूद्ध कंत्राटदारचेच उपोषण
कोळसेवाडी, कल्याण पश्चिमेत अशाप्रकारे वाहने उचलण्याची कारवाई पालिका, वाहतूक विभागाकडून सुरू आहे. रस्त्यांवरील भंगार वाहने उचलण्यापूर्वी त्या वाहनांवर मालकांनी सात दिवसात संबंधित वाहने उचलून न्यावी अशी सूचना वाहतूक विभागातर्फे लावण्यात येते. सात दिवसात वाहन मालकाने वाहन तेथून हटविण्यात आले नाहीतर ते वाहन बेवारस आहे समजून पालिका आणि वाहतूक विभाग ते वाहन उचलण्याची कारवाई करत आहेत, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.रस्त्यांवर आपली वाहने धूळखात उभी असतील तर वाहन मालकांनी तातडीने आपली वाहने रस्त्यांनवरुन उचलून घ्यावीत अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाहतूक विभागाने वाहन मालकांना दिला आहे.
“वर्दळीच्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी अपघातग्रस्त, बंद पडलेली वाहने मालकांनी उभी करुन ठेवली आहेत. ही वाहने वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. अशाप्रकारची वाहने पालिका आणि वाहतूक विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून उचलून आधारवाडी कचराभूमीवर नेण्यात येत आहेत.”-उमेश गित्ते.पोलीस निरीक्षक,वाहतूक शाखा, डोंबिवली