लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: ठाणे महापालिकेचे वादग्रस्त साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना बुधवारी ठाणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. ठाणे काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत ठाणे पोलिसांकडे अर्ज केला होता. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट पाचने त्यांना चौकशीसाठी बोलावून शैक्षणिक कागदपत्र मागवून घेत त्यांची चौकशी केली आहे. आठवड्याभरात त्यांची तिसऱ्यांदा पोलिसांनी चौकशी केली आहे.
ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. तसेच आहेर यांच्याविरोधात कारवाईची मागणी आव्हाड यांनी विधान परिषदेत केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहेर यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ठाण्यातील काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनीही आहेर यांच्याविरोधात कारवाईच्या मागणीचे पत्र ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिकेस दिले होते. तसेच त्यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर मागील आठवड्यात वर्तकनगर पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी आहेर यांची चौकशी केली होती.
आणखी वाचा- निरीक्षण गृहातील शिक्षिकेकडूनच अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ
मंगळवारी शिवसेनचे आमदार अनिल परब यांनी आहेर हा अधिकारी १० वी उत्तीर्ण आहे. तरीही त्याला ठाणे महापालिकेत वरच्या हुद्द्यावर पदोन्नती मिळाली कशी किंवा तो दोन वेळा निलंबित झाला असताना या अधिकाऱ्यास मोक्याच्या ठिकाणी पदभार कसा सोपविण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महेश आहेर यांचे अधिकार काढून त्याची चौकशी करणार असल्याची माहिती विधानपरिषदेत दिली. त्यानंतर बुधवारी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी चौकशी केली. त्यांच्याकडून शैक्षणिक कागदपत्र पोलिसांनी मागवून घेतले आहेत. आहेर यांची आठवड्याभरात ठाणे पोलिसांनी तिसऱ्यांदा चौकशी केली आहे.