लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली: येथील पश्चिम भागातील गरीबाचापाडा, उमेशनगर, देवीचापाडा, नवापाडा भागात विजेचा अचानक लपंडाव सुरू झाल्याने रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत. महावितरणने या भागात छुपे वीज भारनियमन सुरू केले आहे का, असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. दररोज संध्याकाळी चार वाजता डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा फीडरवरुन वीज पुरवठा होणाऱ्या उमेशनगर, देवीचापाडा भागाचा वीज पुरवठा खंडित होत आहे. अर्धा ते पाऊण तास वीज पुरवठा बंद होत असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे.

एकीकडे वीज भारनियमन केले जात नाही, असे आश्वासन महावितरणकडून दिले जाते. दररोज वीज पुरवठा खंडित होण्याचे कारण काय, असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. काही वेळा रात्री तर दिवसा वीज पुरवठा बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे महावितरणने दिवसभर वीजपुरवठा बंद ठेऊन पूर्ण केली आहेत. आता वीज जाण्याचे कारण काय, असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत.

हेही वाचा… जलयुक्त शिवार अभियान राबविताना स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

घरात, बाहेर कडक उन्हामुळे रहिवासी हैराण आहेत. उन्हाच्या झळा घरात बसुनही येत आहेत. अशा परिस्थितीत वीज गेली की रहिवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण होत आहे. अनेक नोकरदार घरातून कार्यालयीन काम करतात. स्थानिक इंटरनेट सेवा बहुतांशी घरांमध्ये आहे. वीज पुरवठा बंद झाला की इंटरनेट सेवा बंद पडते. त्यामुळे कार्यालयीन काम करणे अवघड होते. काही नोकरदार विदेशातील वेळेप्रमाणे दुपारी तीन पासून काम सुरू करतात. त्यांना वीज गेली की सर्वाधिक त्रास होतो.

हेही वाचा… मुरबाड रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण आंबिवली- मोहिली येथे ग्रामस्थांनी बंद पाडले

गरीबाचापाडा भागात काही तांत्रिक अडचण असेल तर महावितरणच्या वरिष्ठांनी ती तातडीने दुरुस्त करावी. तसेच, डोंबिवली पश्चिमेत बेकायदा इमारतींना स्थानिक रोहित्रावरुन नियमबाह्य वीज पुरवठा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा फटका नियमित वीज देयक भरणाऱ्या रहिवाशांना बसतो. हे गैरप्रकार रोखण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा… ठाण्यातील शौचालय कामांचे होणार त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण

डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाणपाडा भागात हरितपट्ट्यात बेकायदा शिव सावली गृहप्रकल्पाला खंडोबा मंदिर भागातील रोहित्रावरुन नियमबाह्य वीज पुरवठा देण्यात आला आहे, अशा तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या आहेत. आता या बेकायदा गृहप्रकल्पाला स्वतंत्र रोहित्र बसून देण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interrupted power supply in garibachapada dombivli dvr