शहापूर – आसनगाव ते कसारा मार्गावर लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरलेली असतानाच, त्यात आता सुरु असलेल्या लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकात वंदेभारत आणि इतर एक्सप्रेस गाड्या सोडल्या जात आहेत. त्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. तर, जलद लोकल गाड्याही धिम्या मार्गावरुन चालवल्या जात असल्याने नोकरदार वर्गाला कामाला पोहोचण्यास दररोज उशीर होत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात प्रवाशांचा रोष वाढत असून, संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आसनगाव आणि कसारा लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करणार नसल्यामुळे मध्यरेल्वे प्रशासनाने यंदाही आसनगाव – कसाऱ्याला सापत्न वागणूक देऊन प्रवाशांच्या संतापात भर घातली आहे. नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकात आसनगाव आणि कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली नसल्याने मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. पीक अवर्समध्ये प्रवाशांना अक्षरशः दरवाजाला लटकत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लोकलमधून पडल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर असतानाही निर्ढावलेले रेल्वे प्रशासन मात्र, हातावर हात धरून बसले असून टिटवाळा ते कसारादरम्यान स्थानकांवर प्रवाशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा – ठाकुर्लीत उड्डाण पूल बाधित रहिवाशांचे विकासकाकडून पुनर्वसन
गेली कित्येक वर्ष कसारा – आसनगाव भागात एकही नवीन लोकल वाढविण्यात आली नसून कसारा आणि आसनगाव येथे अप आणि डाऊन लोकल थांबवून वंदेभारत सह अन्य मेल, एक्सप्रेस पुढे काढून लोकल २० मिनिटांहून अधिक उशिरा केल्या जातात याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. यांसह, आसनगाव स्थानकात अर्धवट स्थितीत असलेला होम प्लॅटफॉर्मचे तत्काळ काम सुरू करणे, कसारा दिशेकडील २०१८ ला तोडलेला अतिमहत्वाचा पादचारी पूल बांधणे, पूर्व-पश्चिम वाहतुकीचा उड्डाणपूल मंजूर करणे, आटगाव स्थानकात जुन्या पडक्या पादचारी पुलावरील तिकीट ऑफिसचे प्रवाशांच्या सोयीनुसार व्यवस्थापन करणे, खडावली स्थानकात आसनगाव दिशेला पादचारी पुलाची उपाययोजना करणे, कसाराहून मुंबई कडे जाणाऱ्या पहाटेच्या पहिल्या दोन लोकल दरम्यान एक नवीन लोकल वाढविणे, कसाराहून सुटणाऱ्या पहाटेच्या सर्व लोकल जलद करणे, खर्डी स्थानकाजवळ पूर्व पश्चिम वाहतुकीचा उड्डाणपूल मंजूर करणे, टिटवाळा ते कसारा स्थानकांत मूलभूत सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करणे, स्थानकांच्या दोन्ही बाजूस महिलांसाठी स्वच्छ शौचालय करणे, टिटवाळा स्थानकात फलाट क्र.१ वर कसारा दिशेकडे डिजिटल वेळापत्रक बोर्ड लावणे, लोकलमध्ये प्रथम श्रेणी डब्यात तिकीट तपासणी योग्य रीतीने आणि नियमित करणे यांसह प्रवाशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत कार्यवाही करावी अशी मागणी कल्याण – कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनतर्फे उमेश विशे यांनी केली आहे.
हेही वाचा – आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी वस्तीमधील जमावाची अंधेरी पोलिसांवर दगडफेक
प्रत्येक लोकलची नियोजित वेळ निश्चित असते. त्यानुसार, त्या-त्या लोकल चालत असतात. एखादी लोकल मागे-पुढे होण्याची तात्कालिक आणि तात्पुरते तसेच वेगवेगळे कारण असू शकते. उपनगरी आणि मेल/ एक्सप्रेससह सर्वच लोकल वेळेवर चालविण्याचा प्रशासनाचा नेहमीच प्रयत्न असतो. – पी.डी पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्यरेल्वे.