ठाण्याच्या ठळक वैशिष्टय़ांपैकी एक मानले जाणारे प्रादेशिक मनोरुग्णालय गेल्या एक शतकाहून अधिक काळ शहराच्या वेशीवर कार्यरत आहे. महाराष्ट्रातील चार शासकीय मनोरुग्णालयांपैकी एक असलेल्या या रुग्णालयात मुंबई, रायगड, पालघर, धुळे, जळगाव येथून रुग्ण येतात. गेल्या शंभर वर्षांच्या काळात मनोविकारांवरील उपचार पद्धतीत अनेक बदल झाले. अनेक नवी औषधे आली. त्याचप्रमाणे बदलती जीवनशैली आणि ताणतणावांमुळे मानसिक आजारांचे प्रमाणही वाढले. मनोव्यापाराशी निगडित आजारांवर शुश्रूषा करणाऱ्या या रुग्णालयातील कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्यासाठी अधीक्षक राजेंद्र शिरसाठ यांच्याशी साधलेला संवाद…

राजेंद्र शिरसाठ, अधीक्षक मनोरुग्णालय, ठाणे</strong>

* ठाणे जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयात सरासरी रुग्णांची संख्या किती आहे?
शतकापूर्वी ठाणे शहरात स्थापन झालेल्या संस्थांमध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाचा समावेश होतो. १९०१ मध्ये या मनोरुग्णालयाची स्थापना झाली आहे. येथे साधारणत: दर दिवशी सरासरी १५५० रुग्णांवर उपचार होत असतात. त्यातील तीन ते चार रुग्ण उपचार घेऊन घरी जातात. बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांना पुन्हा त्रास झाल्यास त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करून घेतले जाते. त्यामुळे रुग्णसंख्या कमीजास्त होत असते. काही वयोवृद्ध रुग्णांना त्यांच्याविषयी काहीच सांगता येत नाही. त्यांना काहीही आठवत नाही. त्यांचे नातेवाईकही चौकशीसाठी येत नाहीत. अशा रुग्णांची घरवापसी करता येत नाही. त्यांची व्यवस्था एका स्वतंत्र कक्षात करण्यात आली आहे.
* परप्रांतीय रुग्णांची घरवापसी कशी केली जाते?
तामिळनाडू, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून पळून किंवा चुकून आलेल्या मनोरुग्णांची भाषा समजणे फार कठीण असते. अशा वेळी दुभाषिकाची मदत घेऊन वा इंटरनेट, स्थानिक पोलीस, व्हॉट्सअप आदी माध्यमांतून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जातो. तसेच त्यांच्या राज्यातील मनोरुग्णालयात त्यांना भरती केले जाते. ज्यांना काहीच कळत नाही, अशांची काळजी रुग्णालयातर्फे घेण्यात येते. त्यांच्यावर औषधोपचार केला जातो. हे रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्याकडून माहिती मिळाल्यास त्यांची ओळख पटण्यास मदत होते.
* मनोरुग्ण आहे हे कळण्यासाठी कशा प्रकारे वैद्यकीय चाचणी केली जाते?
कोणत्याही रुग्णाची आधी शारीरिक तपासणी केली जाते. त्यानंतर मानसिक वैद्यकीय चाचणीमध्ये निरीक्षण पद्धतीचा प्रथम वापर केला जातो. त्यांच्याशी सुसंवाद साधला जातो. बऱ्याच चाचण्या केल्या जातात. संबंधित व्यक्ती मनोरुग्ण आहे, याची पुरेशी खात्री पटल्यानंतरच त्याला रुग्णालयात दाखल करून घेतले जाते.
* मनोरुग्णालयात प्रवेश घेण्याची प्रक्रिया कशी आहे?
मनोरुग्णालयात प्रवेश घेण्याची पद्धत खरी तर खूप सोपी आहे. मात्र या पद्धतीविषयी नागरिकांमध्ये अज्ञान आहे. रुग्णालयात प्रवेश घेण्यासाठी तसेच रुग्णालयातून रुग्णाला घरी सोडण्यापूर्वी दोन वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यातील एका तज्ज्ञाची निवड शासकीय पद्धतीने केलेली असते, तर दुसरा तज्ज्ञ हा संबंधित जिल्हय़ाचे मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा मनोविकारांविषयी प्रशिक्षण घेतलेले प्राधिकृत न्यायदंडाधिकारी असतात. दाखल करून घेताना तसेच घरवापसीपूर्वी या दोघांचेही प्रमाणपत्र हे अतिशय गरजेचे असते. या दोन्ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि काटेकोर असतात. तसेच ही सर्व प्रक्रिया न्यायालयामार्फतच केली जाते. न्यायालयीन प्रक्रियेसाठी मनोरुग्णालयात खास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी आदी रक्ताच्या नातेवाईकांना रुग्णाला उपचारांसाठी आणले असेल तर त्यांच्याकडून कलम-२० अन्वये दाखला घेतला जातो. अनेकदा रस्त्यावर बेवारस फिरत असणाऱ्या मनोरुग्णांना स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी घेऊन येतात. अशा वेळी कलम-२३ चा दाखला लागतो.
* मानसिक उपचार म्हणजे शॉक हा समज कितपत खरा आहे? आता नव्या कोणत्या उपचार पद्धती आहेत ?
खरे तर शॉक हा शब्द वापरण्यास आता मनाई आहे. त्याला आम्ही आता विद्युत धक्का उपचार पद्धत म्हणतो. त्यात आता बरीच सुधारणा झालेली आहे. पूर्वी फक्त तीन ते चार औषधे मिळत होती. आता त्यात बरीच वाढ झालेली आहे. आता शासनातर्फेच ४२ प्रकारची औषधे दिली जातात. विद्युत धक्का ही पद्धतीही अवलंबली जाते. पूर्वी हा सर्व प्रकार काहीसा भीतीदायक होता, कारण त्या वेळी भूल न देता विद्युत धक्का दिला जात होता. आता मात्र रुग्णाला भूल दिली जाते. त्यानंतर विद्युत धक्का दिला जातो.
* उपचारानंतर रुग्णांनी किती काळ नियमित औषधे घेणे गरजेचे असते?
कोणताही आजार आटोक्यात आल्यानंतर अल्पकाळ, दीर्घकाळ अथवा कायमस्वरूपी नियमित औषधे घ्यावी लागतात. मानसिक आजारही त्याला अपवाद नाहीत. मात्र नातेवाईकांमध्ये याविषयी गैरसमज असतात. रुग्ण जरा बरा झाला की ते त्यांच्या गोळ्या बंद करतात आणि रुग्णाला परत त्रास सुरू होतो. इतर शारीरिक आजारांमध्ये दिवस ठरलेले असतात. मात्र मधुमेह, रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी कायमस्वरूपी गोळ्या घ्यावा लागतात. त्याचप्रमाणे मानसिक आजारातही उपचाराचा कालावधी नसतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांची मात्रा कमी-जास्त करता येते. औषधांबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते.
* कला आणि इतर कामांचा उपचारात किती फायदा होतो?
‘एम्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप’ म्हटले जाते. त्यामुळे कोणत्याही कामात अथवा आवडीच्या कलेत गुंतून राहिले की मन प्रसन्न राहते. मनोरुग्णालयातील रुग्णांनाही कला आणि विविध प्रकारच्या कामांचा खूप मोठा आधार आहे. पावसाळ्यात त्यांच्याकडून शेती करून घेतली जाते. त्यामुळे रुग्ण बरे होण्यास बरीच मदत होते.
* रुग्ण बरा होण्यात नातेवाईक आणि समाजाची भूमिका कितपत महत्त्वाची ठरते?
अतिशय महत्त्वाची असते. मी तर म्हणेन औषध उपचारांचा भाग केवळ दहा टक्के असतो. बाकी रुग्णाचा ९० टक्के आजार नातेवाईक आणि समाज बरा करीत असतात. त्यांचे रुग्णाशी असलेल्या संबंधांवर बरेच काही अवलंबून असते. समाज आणि नातेवाईक जितके समंजसपणे वागतील, तितक्या जलद गतीने रुग्ण बरा होतो.
* मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची कोणती कारणे आहेत?
एकच एक कारण नाही. अनेक कारणांमुळे व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडते. अशा वेळी प्रत्येक रुग्णाचे वर्तन वेगवेगळे असते. अशा वेळी त्यांच्या कलेने घ्यावे लागते. त्यांना कधी प्रेमाने समजावे लागते, तर कधी ओरडावेही लागते.
* ठाणे जिल्हय़ातील रुग्णांची संख्या किती आहे?
प्रादेशिक मनोरुग्णालयात ठाणे जिल्हय़ातील एकूण ७०० रुग्ण दाखल आहेत. त्यात ३६८ स्त्रिया, तर ३३२ पुरुष आहेत. मुंबईमधील ५१९ रुग्ण असून त्यात २४८ स्त्रिया व २७१ पुरुष आहेत. पालघर जिल्हय़ातील १२ रुग्ण असून त्यातील सात स्त्रिया, तर पाच पुरुष आहेत. रायगड जिल्हय़ातील ४८ रुग्ण असून २० स्त्रिया, तर २८ पुरुष आहेत. नाशिक, धुळे, जळगाव येथील रुग्णही मनोरुग्णालयात आहेत.
* मनोरुग्णालयात रुग्णांना कोणता आहार दिला जातो?
आहाराची काळजी आम्ही घेतो. आमच्याकडे स्वतंत्र आहार विभाग आहे. तिथे आहारतज्ज्ञही काम करतात. रुग्णालयात ३६ स्वयंपाकी आहेत. रुग्णांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि रात्रीचे जेवण दिले जाते. यामध्ये जे मांसाहारी आहेत, त्यांना आठवडय़ातून एकदा बोनलेस चिकन, आठवडय़ातून एकदा अंडा करी, तसेच रुग्ण शारीरिकदृष्टय़ा विकलांग असल्यास एक अंडे, केळी अशा पद्धतीने त्यांच्या खाण्याची काळजी घेतो.
मुलाखत: भाग्यश्री प्रधान

Story img Loader