ठाणे : मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी स्वतंत्र डबे आहेत. असे असतानाही रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) दुर्लक्षामुळे पुरुष फेरीवाल्यांची सर्रास या डब्यांमध्ये घुसखोरी सुरू आहे. या घुसखोरीमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच फेरीवाल्यांसदर्भात अनेक तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या तक्रारी महिला प्रवाशांकडून केल्या जात आहे.
मध्य रेल्वे मार्गावरून दररोज लाखो नोकरदार मुंबईत नोकरीनिमित्ताने प्रवास करत असतात. या प्रवाशांमध्ये पुरुषांप्रमाणे महिलांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे. उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये महिला प्रवाशांसाठी एकूण तीन डबे उपलब्ध आहेत. या डब्यांमध्ये पुरुष प्रवाशांना प्रवेश बंदी आहे. तरीही महिला प्रवाशांबाबतीत अनेक गुन्हे घडल्याचे यापूर्वी समोर आले आहे. असे असतानाच, दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खाद्य पदार्थ, महिलांच्या दररोजच्या वापराच्या वस्तू विक्री करणारे फेरीवाले महिला डब्यांमध्ये शिरत आहेत. या फेरीवाल्यांमध्ये पुरुष फेरीवाल्यांचे प्रमाणदेखील अधिक आहे. डब्यामध्ये महिलांची गर्दी असतानाही पुरुष फेरीवाले डब्यामध्ये शिरत असतात.
सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काही महिला प्रवासी आणि संघटनांकडून या बाबत अनेकदा रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडे समाजमाध्यमांवर तक्रारी केल्या जातात. परंतु या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे महिला प्रवाशांचे म्हणणे आहे. यासंदर्भात रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, आम्ही विशेष कारवाई केल्या आहेत. तसेच यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यात मोठ्या प्रमाणावर पुरुष फेरीवाले आढळून येत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी दिल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. महिलांना सुरक्षित वाटावे म्हणून स्वतंत्र डबे आहेत. त्यात प्रवेश करण्यास देखील कठीण असते. परंतु पुरुष फेरीवाले सर्रास या डब्यामध्ये प्रवेश करतात. उपनगरीय रेल्वे गाड्यांप्रमाणे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्येदेखील हे फेरीवाले शिरतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. – लता अरगडे, अध्यक्ष, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटना.