कल्याण – डोंबिवलीत ६५ महारेरा प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा इमारतींची उभारणी करून नागरिकांची घर विक्रीच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एकालाही सोडण्यात येणार नाही, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. शासनाने डोंबिवलीतील बेकायदा इमारत प्रकरणांची गंभीर दखल घेतल्याने महसूल, पोलीस यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

या बेकायदा इमारतींची जमीन, बिनशेती, बांधकाम परवानग्या, महसूल आणि पालिकेची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या, ही बनावट कागदपत्रे महारेराकडे दाखल करून त्या माध्यमातून बेकायदा इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून देणाऱ्या भूमाफियांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे, अशी माहिती एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याने नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर दिली. आयरेतील विकासक शालीक भगत यांच्यावर महसूल विभागाने गुन्हा दाखल करण्याचे दिलेले आदेश ही आता सुरुवात आहे, असे अधिकारी म्हणाला.डोंबिवलीत सर्वाधिक बेकायदा इमारतींची उभी करणारे भूमाफिया, या बेकायदा इमारतींचे दस्त नोंदणीकरण करण्यासाठी पुढाकार घेणारे आणि ही बनावट कागदपत्रे महारेराकडे दाखल करून त्या माध्यमातून बेकायदा इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून देणारे दोन निर्ढावलेले भूमाफिया आणि एक मध्यस्थ महिला पहिल्या टप्प्यात चौकशीसाठी ताब्यात घेण्याची व्यूहरचना पोलीस यंत्रणा आखत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ६५ महारेरा बेकायदा इमारत उभारणीत २६० माफियांचा समावेश आहे.

आठ वर्षापूर्वी डोंबिवलीतील नांदिवली पंचानंद येथील एका सर्वे क्रमांकावर ८५ भूमाफियांनी ५० हून अधिक बेकायदा इमारती बांधल्याचे प्रकरण उघडकीला आले होते. याप्रकरणाची पोलिसांच्या मालमत्ता विभागाचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र चव्हाण, उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांनी तपास केला होता. मालमत्ता विभागाने सात जण मयत झाल्याने ७८ भूमाफियांवर कल्याण न्यायालयात पाच वर्षापूर्वी ११ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील दोन निर्ढावलेले भूमाफिया ६५ महारेरा बेकायदा इमारतीत कागदोपत्री सहभागी आहेत. डोंबिवलीत सर्वाधिक बेकायदा इमारती उभारणीत या भूमाफियांचा महत्वाचा वाटा आहे. निर्भय बनो संस्थेचे महेश निंबाळकर यांनी या भूमाफियांच्या बेकायदा इमारतीच्या अनेक तक्रारी, शासनाकडे केल्या आहेत. २७ गाव, डोंंबिवलीतील बेकायदा इमारतींची दस्त नोंदणी सुरू करण्यासाठी हेच भूमाफिया पुढाकार घेत होते. हे माफिया लवकरच चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.

महसूल विभाग आक्रमक

डोंबिवली आयरेतील मे. साई डेव्हलपर्सचे भागीदार बेकायदा साई गॅलेक्सीचे निर्माते शालीक भगत यांच्यावर बनावट सात बारा उताऱ्याचा वापर करून खरेदी खत दस्त नोंदणीकृत केल्याने, या माध्यमातून शासनाची फसवणूक केल्याने तहसीलदार सचिन शेजाळ यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. प्रांत विश्वास गुजर, तहसीलदार शेजाळ यांनी डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींसह इतर बेकायदा इमारतींच्या महसूलविषयक कागदपत्रांची तपासणी सुरू केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. महसूल आणि पोलीस यंत्रणांनी संयुक्तपणे बनावट कागदपत्रे शोध मोहीम सुरू केली आहे.