कल्याण- डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती प्रकरणांवरुन ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने बेकायदा इमारत मालकांविरुध्दचा सापळा घट्ट करण्यास सुरुवात केली असताना, आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात हस्तक्षेप करुन पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी केली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्राने दिली. या अधिकाऱ्यांच्या नाव, भेटी विषयी पालिकेत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- जाहीर सभेत हातवाऱ्यांसहित राज ठाकरेंची नक्कल करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; म्हणाल्या, “जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील…”

एकाचवेळी विशेष तपास पथक, ईडीने बेकायदा इमारत प्रकरणात हस्तक्षेप केल्याने जबाबदार उपायुक्त, विभागीय उपायुक्त, साहाय्यक आयुक्त यांची भंबेरी उडाली आहे. या प्रकरणाचा शेक आपणास लागू नये म्हणून कधी नव्हे उच्चपदस्थ अधिकारी एकदम गतीमान होऊन प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करा म्हणून कर्तव्यतत्पर झाले आहेत. मात्र, प्रभागातील साहाय्यक आयुक्त वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन बेकायदा इमारतींना गॅस कटरने दोन छिद्र आणि छताचे दोन स्लॅब तोडून कारवाई थांबविण्यात धन्यता मानत आहेत.

हेही वाचा- ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरात उद्या पाणी नाही

डोंबिवली पश्चिमेत गरीबाचापाडा येथे पालिका अग्निशमन केंद्रा समोर एका भूमाफियाने सात माळ्याची बेकायदा इमारत बांधली आहे. ६५ बेकायदा इमारतीत या इमारतीचा समावेश आहे. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी दोन दिवस या इमारतीवर कारवाई करण्यात आली असली तरी ती अर्धवट कारवाई करुन संपूर्ण इमारत जैसे थे उभी राहिल याची खबरदारी घेतली आहे. या कारवाई संदर्भात साहाय्यक आयुक्त रोकडे यांना सतत संपर्क करुनही ते संपर्काला प्रतिसाद देत नाहीत. ह प्रभाग हद्दीत बेसुमारे टोलेजंग इमारतींची कामे सुरू आहेत.

‘ईडी’चा फास

बेकायदा बांधकामांच्या उभारणीसाठी भूमाफियांनी कोणत्या मार्गाने पैसा उभारला. सदनिका विक्रीतून मिळालेल्या पैशाचा कोठे विनीयोग केला. पालिका, शासनाचे कर, अधिभार भरणा केले की नाही अशा नजरेतून ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याने ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाशी संबंधित पालिकेतील दोन अधिकाऱ्यांची नुकतीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. या प्रकरणातील याचिकाकर्त्यांचीही ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याचे समजते.

हेही वाचा- उल्हासनगरात धुळ रोखण्यासाठी तुषार फवारणी यंत्रणा कार्यान्वित; हवेचा दर्जा सुधारण्यासाठी दोन यंत्रे, गर्दीच्या ठिकाणी होणार फवारणी

चौकशी अहवाल दाखल

कडोंमपा अधिकाऱ्यांकडून विशेष तपास पथक, ईडी अधिकाऱ्यांना समग्र माहिती दिली जाण्याची शक्यता कमी आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मागील ३५ वर्षापासून कशाप्रकारे बेकायदा बांधकमे उभी राहीली. या बांधकामांच्या चौकशीसाठी शासनाकडून स्थापन करण्यात आलेले निवृत्त सचिव काकोडकर, निवृत्त न्या. ए. एस. अग्यार, पुण्याची पर्यावरण संवर्धन संस्था, निवृत्त कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांनी दोन वर्षात दिलेल्या ७५० बांधकाम प्रकरणांची चौकशी करण्यासाठी नगररचना उपसंचालक सुधाकर नागनुरे समितीचा अहवाल. बेकायदा बांधकामांचे शासनाचे २५ वर्षातील अध्यादेश अशी समग्र माहिती डोंबिवलीचे माहिती कार्यकर्ते कौस्तुभ गोखले, कल्याणचे श्रीनिवास घाणेकर यांनी ईडी, तपास पथकाकडे दाखल केली आहे. या प्रकरणात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दोघांनी दर्शवली आहे. पालिका अधिकारी याविषयी काहीही बोलण्यास तयार नाहीत. मागील काही वर्षातील बेकायदा बांधकामाशी संबंधित अधिकारी दीर्घ सुट्ट्या टाकून रजेवर गेले आहेत. या अधिकाऱ्यांच्या सुट्टयांची पालिकेत चर्चा सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investigation of kalyan dombivli municipality about 65 illegal buildings constructions dpj