डोंबिवली- डोंबिवली पूर्व भागातील आयरे गाव हद्दीतील बुजविलेल्या तलावाची शासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या तलावामध्ये भराव टाकून बेकायदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. गावचा नैसर्गिक स्त्रोत आणि गणपती विसर्जन तलाव म्हणून आयरे तलाव ओळखला जात होता.या तलावातील पाणी उन्हाळ्यामध्ये आटले की भूमाफियांकडून तलावात राडारोडा टाकून तलाव बुजविण्यात आला. मागील काही वर्षाच्या कालावधीत अशाप्रकारे भराव टाकून तलाव बुजविण्याचे काम करण्यात आले. आता तलावाच्या जागेत बेकायदा चाळी उभारुन भूमाफियांनी लाखो रुपये कमविले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकसत्ता’ने दोन महिन्यापूर्वी आयरे गावातील तलाव बुजविल्याचे प्रकरण बाहेर काढले होते. त्यावेळी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी तलावाच्या जागावेर उभ्या असलेल्या बेकायदा चाळी आणि प्रभागातील इतर १४ बेकायदा इमारती तोडण्याचे आदेश ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांना दिले होते. साहाय्यक आयुक्त साबळे यांनी ही बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविला आहे, अशी कारणे देऊन वेळकाढूपणा केला.साबळे बेकायदा बांधकामांच्यावर कारवाई करत नसल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे वाढल्या होत्या. आयरे प्रभागात बेकायदा बांधकामे वाढत असताना साहाय्यक आयुक्त साबळे कारवाई करत नसल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यावर गेल्या महिन्यात आयुक्तांनी त्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली.

हेही वाचा >>>६५ बेकायदा इमारत प्रकरण, कल्याण डोंबिवली पालिका अधिकाऱ्यांची पोलिसांच्या ‘एसआयटी’कडून चौकशी

सोमवारपासून सुरू झालेल्या विधीमंडळ अधिवेशनात आयरे गावातील बुजविलेल्या तलावाचा विषय उपस्थित होणार आहे. त्यामुळे ग प्रभागाचे विद्यमान साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांनी महसूल विभागाशी संपर्क करुन तलावाचा सातबारा उतारा, त्याच्या नोंदी यांचे संकलन करुन तलावा संदर्भातचा अहवाल पालिका मुख्यालयात पाठविला आहे. महसूल विभागाने तलाव ब्रिटिशकालीन नसल्याची माहिती पालिकेला दिली आहे.

हेही वाचा >>>भिवंडीतील चोरांकडून कल्याण रेल्वे स्थानकात मोबाईल चोरीच्या घटना

‘तलावाचे प्रकरण अंगाशी आल्यामुळे महसूल, पालिका अधिकारी आता बचावाची भूमिका घेत आहेत. ग्रामपंचायत काळापासून आयरे गावातील गणपती आयरे तलावात विसर्जन केले जात होते. नाांदिवली, भोपर याठिकाणी गावचे तलाव आहेत. त्याप्रमाणे आयरे गावचा तलाव होता. त्यामुळे अधिकारी चुकीची माहिती शासनाला देत आहेत. तलाव बुजवून त्यावर बेकायदा चाळी माफियांनी बांधल्या आहेत, अशी माहिती आयरे गावचे रहिवासी, माजी नगरसेवक रवी पाटील यांनी दिली.

“ आयरे तलाव हा अलिकडच्या काळातील तलाव आहे. बुजविलेल्या तलावाच्या ठिकाणी कोणत्याही खुणा दिसत नाहीत. याठिकाणी पाच ते सहा चाळी आहेत. त्या जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. ”-संजय कुमावत,साहाय्यक आयुक्त,ग प्रभाग क्षेत्र, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investigation of submerged lake at ayre village in dombivli amy
Show comments