लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण – माजी कुलगुरू आणि शिक्षणक्षेत्रातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व प्राचार्य अशोक प्रधान मारहाण प्रकरणाचा तपास अतिशय जलदगतीने व्हावा. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर जलदगतीने न्यायालयात आरोपपत्र दाखल करता यावे. तसेच, या प्रकरणाच्या तपासात कोणत्याही त्रृटी राहू नयेत म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रा. प्रधान यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी, २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात समर्थन सभेचे आयोजन करण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून आयोजकांनी ही सभा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री कपील पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी प्रधान यांची भेट घेऊन शासनस्तरावरील आपल्या नेत्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली.
आणखी वाचा-दिव्यात भाजपला पुन्हा धक्का, भाजपा माजी महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश
पोलीस उपायुक्त भेट
कल्याणचे पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांनी प्रा. प्रधान यांची शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या प्रकरणाचा सुरू असलेला तपास, फरार आरोपींना अटक करण्यासाठी सुरू असलेल्या तपासाची माहिती दिली. या गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा म्हणून हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्तांनी प्रतिष्ठीतांना दिली.
आरोपी न्यायालयीन कोठडीत
आरोपी बडतर्फ शिक्षक संजय जाधव, सुदेश जाधव यांना शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. उर्वरित एक महिला, एक पुरूष आरोपीचा शोध सुरू आहे. एका आरोपी अल्पवयीन आहे, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी सांगतिले.