ठाणे : उद्योग वाढींसाठी आणि नव्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली कोकण विभागीय गुंतवणुक परिषद नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या परिषदेच्या माध्यमातून तब्बल ८ हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असून याद्वारे ७२ हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर यामध्ये उद्योजकांकडून ठाणे जिल्ह्याला पसंती देण्यात आली असून ४ हजार कोटींची गुंतवणूक ही एकट्या ठाणे जिल्ह्यात करण्यात आली आहे.
कोकण विभागातील विविध जिल्ह्यांना केंद्रस्थानी ठेऊन गुंतवणूक आकर्षित करणे, गुंतवणूकदार तसेच व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, विभागातील प्रत्येक जिल्ह्याला अधिकाधिक निर्यातक्षम बनविण्यासाठी उद्योग संचालनालय, मुंबई अंतर्गत व उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंग कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन भवन येथे “कोकण विभागीय गुंतवणूक परिषद” आयोजित करण्यात आली होती. या गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेच्या माध्यमातून विभागामध्ये ८ हजार ५०० कोटी इतकी गुंतवणूक होणार असून त्या माध्यमातून ७२ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.
कोकण विभाग हा भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून नवीन गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे. राज्यात पायाभूत सोयी सुविधा, समृध्दी महामार्ग, वाढवण बंदर निर्मिती यामुळे निर्यातीस प्रोत्साहन मिळत असून भविष्यात कोकण लॉजिस्टिक्स व शिपिंग हब म्हणून उदयास येईल.असे मत यावेळी विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
या परिषदेच्या अनुषंगाने कोकण विभागात एकूण ३३१ नामांकित उद्योग घटकांनी शासनासोबत सामंजस्य करार केले. या सामंजस्य करारान्वये कोकण विभागात ८ हजार ५०० कोटी इतकी गुंतवणूक होणार असून त्यामध्ये ७२ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. या परिषदेमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी काही उद्योगांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सामंजस्य कराराचे वाटप करण्यात आले.
जिल्हावार उद्योगांमध्ये होणार असलेली गुंतवणूक आणि रोजगार
ठाणे: 65 उद्योग, गुंतवणूक – 4 हजार 783 कोटी, रोजगार – 64 हजार 082
पालघर: 138 उद्योग, गुंतवणूक – 1 हजार 492 कोटी, रोजगार – 4 हजार 777
रायगड: 33 उद्योग, गुंतवणूक – 931.5 कोटी, रोजगार – 1 हजार 647
रत्नागिरी: 52 उद्योग, गुंतवणूक – 936.25 कोटी, रोजगार – 1 हजार 125
सिंधुदुर्ग: 43 उद्योग, गुंतवणूक – 313.56 कोटी, रोजगार – 872