ठाणे : गुंतवणुकीच्या मोबदल्यात पाच ते आठ टक्के इतका मासिक परतावा देण्याच्या बहाण्याने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने कंपनीचा संचालक समीर थिटे याला अटक केली आहे. तर, त्याची भागीदार सारिका भानुसे हिचा पोलीस शोध घेत आहेत. समीर थिटे याला माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या हस्ते एक पारितोषिक मिळाले होते. त्याचे छायाचित्र वापरून देखील तो गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित करत होता अशी माहिती तपासात समोर येत आहे.
याप्रकरणात आतापर्यंत चार ते पाच गुंतवणूकदारच पुढे आले आहेत. परंतु गुंतवणूकदारांची संख्या शेकडोच्या घरात असून याबाबत आता तक्रारी पुढे येण्याची शक्यता आहे. फसवणूक झालेले बहुतांश ठाणे, मुंबई, पुणे भागातील सेवा निवृत्त आहेत. आयुष्यातील जमा पुंजी त्यांनी यात गुंतविली आहे.
वागळे इस्टेट येथे २०२१ मध्ये समीर थिटे याने सॅमसन युनिट्रेड कंपनी स्थापन केली होती. त्यांच्या कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास दरमहा पाच ते आठ टक्के परतावा मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यासाठी त्याने काही वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली होती. त्यामुळे ठाणे, मुंबई, पुणे भागातील अनेकांनी या कंपनीत पैसे गुंतवण्यास सुरुवात केली होती. कमीत-कमी ५० हजार रुपयांची गुंतवणूक यामध्ये करावी लागत होती. त्यासाठी समीर थिटे हा गुंतवणूकदारांसोबत वार्षिक करारपत्र तयार करत होता.
हेही वाचा – ठाण्यात इलेक्ट्रीक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट; तीन जण जखमी
सुरुवातीचे काही महिने त्याने गुंतवणूकदारांना परतावा दिला होता. मागील वर्षभरापासून त्याने गुंतवणूकदारांना परतावा देणे बंद केले होते. काही गुंतवणूकदारांनी त्यांची मूळ रक्कम मागितली. परंतु ही रक्कम देण्यास देखील तो टाळाटाळ करू लागला. याप्रकारामुळे एका गुंतवणूकदाराने त्याच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा समांतर तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी समीर थिटे याला १३ मार्चला अटक केली आहे. फसवणुकीची रक्कम १० कोटी रुपयांहून अधिक असू शकते असा अंदाज पोलिसांचा आहे.
याप्रकरणात शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. थिटे हा माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या हस्ते पुरस्कार घेत असल्याचे छायाचित्र आहे. त्याने ते कार्यालयात ठेवले आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी त्यावर विश्वास ठेवला असे एका गुंतवणूकदाराने सांगितले.
हेही वाचा – आमदार राजन साळवी यांच्या पुतण्याची एसीबीकडून पाच तास चौकशी
याप्रकरणात समीर थिटे याला अटक केली आहे. ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. त्यांना संपर्क साधण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आमच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने केले आहे.