डोंबिवली : मुंबईतील मालाडा मनोरी भागात आपण ९० बंगल्याचा रो हाऊस प्रकल्प बांधत आहोत. या प्रकल्पात गुंतवणूक केली तर आपणास अल्पावधीत चांगला फायदा होईल या विकासक आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन डोंबिवलीतील कोपर गाव भागातील एक कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी ४४ लाख रूपयांची गुंतवणूक या रो बंगला प्रकल्पात केली. या गुंतवणुकीसाठी बँकेत ठेव रकमेत, म्युच्युअल फंड गुंतवणुकीत ठेवलेल्या रकमा या कुटुंबीयांना मोडल्या. मागील सहा वर्षापूर्वी केलेली गुंतवणूक आणि त्यावरील व्याज असे एकूण ८१ लाख ७० हजार रूपये परत मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या कुटुंबातील महिलेने या प्रकरणी विकासक आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
तक्रारदार महिलेने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, आपले पती बांधकाम व्यवसायात होते. या काळात जवळील रक्कम चांगल्या ठिकाणी गुंतवणुकीचे आम्ही नियोजन करत होते. पतीचे परिचित सनदी लेखापालाने एक विकास मुंबईतील मालाड मनोरी येथे ९० बंगल्यांचा रो हाऊस प्रकल्प बांधत आहे. त्या गृहप्रकल्पात आपण गुंतवणूक केली तर आपणास चांगला परतावा मिळेल. त्यांच्या एका परिचिताने त्या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे, असे सांगितले. तक्रारदार महिला, तिच्या पतीने विकासकाची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. विकासकाने आपण मालाड मनोरी येथे रो हाऊस प्रकल्प उभारत असल्याचे आणि तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे सांगितले.
तक्रारदार महिला आणि तिच्या नातेवाईकांनी एकूण ४४ लाख रूपये रो हाऊस प्रकल्पात गुंतवले. त्या रकमेवर दीड टक्क्याने काही महिने परतावा मिळाला. त्यानंतर परतावा मिळणे बंद झाले. परतावा मिळत नाही, रो हाऊस प्रकल्प सुरू होत नाही म्हणून महिलेने सनदी लेखापाल आणि त्यांच्या सहकाऱ्याला याबाबत विचारणा केली. त्यांनी लवकरच हा प्रकल्प सुरू होईल, असे सांगितले.
हेही वाचा…डोंबिवलीत कोळेगावातून बांगलादेशी महिलांना अटक
रहिवाशांना माहिती मिळाली की विकासक कोणताही रो हाऊस प्रकल्प उभारत नाही. विकासकाची तक्रारदार महिला आणि तिचा पतीन यांनी भेट घेतली. त्यांनी टप्प्याने रक्कम देण्याचे कबुल केले. दरम्यानच्या काळात विकासकाला आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने एका प्रकरणात अटक केली. विकासकाची सुटका झाल्यावर गुंतवणूकदारांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. ते पाळले नाही. आपली गुंतवणुकीची मूळ रक्कम ४४ लाख आणि त्यावरील व्याज रक्कम रुपये ३७ लाख ७० हजार अशी एकूण ८७ लाख ७० हजाराची विकासक आणि त्यांच्या दोन साथीदारांनी आपली फसवणूक केली म्हणून महिलेने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.