डोंबिवली : ठाणे, रायगड जिल्ह्यातील ५० हून अधिक गुंतवणूकदारांची डोंबिवलीतील फडके रोडवरील सिनर्जी इन्व्हेसमेंट ॲडव्हायझर एल. एल. पी. आणि तिच्या इतर सहयोगी गुंतवणूकदार कंपन्यांनी ५० हून अधिक गुंतवणूकदारांची गुंतवणुकीवर १८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे १० कोटीची फसवणूक केली आहे. गुंतवणूकदार कंपन्यांचे संचालक फरार झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे यासंदर्भात शबरीप्रसाद गोपालन आचार्य (५०, रा. तळेगाव, कालवारोड, गोरेगाव तर्फ, माणगाव, रायगड) या शेतकऱ्याने तक्रार केल्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात आचार्य यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…ठाण्याच्या मध्यवर्ती भागात दोन वाहनतळांची उभारणी, दीड वर्षात वाहनतळ उभारणीचा पालिकेचे मानस

महेश आत्माराम भोईर, अनघा महेश भोईर, शार्दुल सुधाकर रानडे, निशील चंद्रकांत राणे, अक्षय महाडिक, शैलेश कानू गावडे आणि इतर संचालक, तसेच या संचालकांशी संबंधित सिनर्जी इन्व्हेसमेंट, फिडलिस कॅपिटल मार्केट, फिडलिस ॲड्व्हटायझर, फिनबस सोल्युशन्स, कॉन्टम मॅनेजमेंट, ऐश्वर्या सिंडीकेट क्रेडिट सोसायटी, सौहार्द क्रेडिट सोसायटी या वित्तीय संस्थांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०१६ ते एप्रिल २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी सांगितले, महेश आत्माराम भोईर आणि इतर संचालकांनी बोगस गुंतवणूक कंपन्या स्थापन केल्या. सिनर्जी इन्व्हेस्टमेंट या गुंतवणूक कंपनीचे कार्यालय डोंबिवली शहरातील फडके रस्त्यावरील कृष्णा या उच्चभ्रूंच्या सोसायटीत अनिल आय रुग्णालयाच्या वरील मजल्यावर सुरू केले. या कंपन्यांनी गुंतवणुकीवर १४ ते १८ टक्के परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविले. या आकर्षक परताव्याला भुलून, या कंपन्यांचे चकाचक कार्पोरेट कार्यालय पाहून गुंतवणूकदार या कंपन्यांकडे आकृष्ट झाले. डोंबिवलीसह ठाणे, रायगड जिल्ह्यातील ५० हून अधिक गुंतवणूकदारांनी या गुंतवणूक कंपनीत लाखो रूपयांच्या रकमा गुंतवणूक केल्या.

हेही वाचा…अजित पवारांनी केले एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचे ऑडिट

या गुंतवणूक योजनेत रायगड मधील माणगाव येथे राहणारे शेतकरी शबरीप्रसाद आचार्य यांनीही ५१ लाख ८० हजार रूपयांची गुंतवणूक केली. ठराविक महिन्यानंतर गुंतवणूकदार कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षक परतावा देणे गरजेचे होते. तो त्यांनी दिला नाही.

विविध कारणे सांगून आकर्षक परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केली. आकर्षक परतावा मिळत नसल्याने काही गुंतवणूकदारांनी मूळ रक्कम परत करण्याची मागणी महेश भोईरसह इतर संचालक यांच्याकडे सुरू केली. ग्राहकांच्या संपर्काला संचालकांनी प्रतिसाद देण्यास टाळाटाळ, उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. नंतर त्यांनी आपले मोबाईल बंद करून ग्राहकांशी संपर्क तोडला.

हेही वाचा…टिटवाळा बल्याणीतील बेकायदा बांधकामांवरून साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना नोटीस

नऊ वर्ष गुंतवणूक करून त्याच्यावर परतावा नाहीच, मूळ रक्कम परत मिळत नसल्याने सिनर्जी इनव्हेस्टमेंट कंपनीसह त्यांच्या इतर गुंतवणूकदार कंपन्या आणि त्यांचे संचालक आपली फसवणूक करत आहेत. त्यांनी आपल्या रकमेचा स्वार्थासाठी वापर करून आपली फसवणूक केली याची खात्री पटल्यावर शबरीप्रसाद आणि इतर गुंतवणूकदारांनी ठाणे आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार केली. आर्थिक गुन्हे विभागाचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investors in thane raigad duped of 10 crores by synergy investment company in dombivli directors abscond psg